आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त ताण अन् ताप!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्षभर बेभाव शेतमालाची विक्री, अतिवृष्टी, गारपिटीचा कोप झेलल्यानंतर कुटुंबाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचा बुरुज दुरुस्तीसाठी शेतकरी नव्याने खरीप हंगामाकडे आस लावून आहे. जून कोरडाच जाण्याच्या स्थितीत आहे. मृग व रोहिणीने पाठ फिरवल्यानंतर आर्द्राच्या मोराचा थुईथुयाटही कुठे दिसण्याची चिन्हे नाहीत. दिवसागणिक पिकांची उत्पादकता घटण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे ग्रामीण भागात ताण वाढत असून, बियाण्यांच्या समस्येमुळे तापही वाढला आहे.

अमरावती- जिल्ह्यात मागील आठवड्यात गारवा देऊन गेलेल्या पावसाने सध्या दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांसह कृषी व्यावसायिकांचीही चिंता वाढली आहे. दरम्यान, मागील वर्षी पाऊस वेळेवर आल्यामुळे जून महिन्यात 46 टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. यावर्षी मात्र केवळ अर्धा टक्के पेरण्या होऊ शकल्या. यात बहुतांश मान्सूनपूर्व कपाशीचा समावेश आहे. सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकत घेतलेल्या सोयाबीन बॅग परत केल्या जात असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
मागील आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागला होता; मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे सावट पसरले आहे. मागील वर्षी अतिवृष्टी, गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. सोयाबीन, तूर, हरभरा आदी पिकांना पावसाचा फटका बसल्यामुळे शेतमाल बेभाव विकावा लागला होता. अशा भीषण परिस्थितीत नव्याने उभे राहण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍यांचा ताप सध्या पावसाने दडी मारल्यामुळे वाढला आहे.

उत्पादकता घटण्याचे संकट : अख्खा जून कोरडा जाण्याच्या स्थितीमुळे दिवसागणिक पेरण्यांना उशीर होत आहे.उत्पादकता घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कोरडवाहू असल्यामुळे पाऊस लांबल्याने या क्षेत्रातील शेतकर्‍यांना फटका बसणार आहे.

मोर्शी तालुक्यात सर्वाधिक पेरणी
जिल्ह्यात एकूण 2,918 हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक लागवड मोर्शी तालुक्यात दोन हजार हेक्टरवर आहे. अमरावती, भातकुली, नांदगाव खं., चांदूररेल्वे, तिवसा, वरुड, दर्यापूर, अंजनगावसुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार, धामणगावरेल्वे तालुक्यांतही कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यात बहुतांश मान्सूनपूर्व कपाशीचा समावेश आहे.