आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती- काहीही झाले तरी पोलिसांवर हात उचलायचा नाही. विधिमंडळात पोलिसाला मारहाण केली. त्याबद्दल मनसेच्या आमदाराला माझी माफी नाहीच. परंतु, कायदा सर्वांसाठी असतो. सर्वांवर कारवाई हवी. परंतु, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी धमकी दिल्यामुळे सरकारने त्यांच्या आमदारांवर कारवाई केली नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. अमरावतीकराच्या पिण्याचे, शेतीचे पाणी पळवून इंडियाबुल्सला देण्यात आले तर येथील जनतेचे आंदोलन झालेच पाहिजे. जनतेचे पाणी पळवून प्रकल्प नको, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळात पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणावरुन राज ठाकरे आज काय बोलणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यांनी या मुद्यावरुन सत्ताधा-यांवर तोफ डागली. ते म्हणाले, आज पोलिसांना माराल. उद्या न्यायाधीशांना माराल. विधिमंडळात काय प्रकार घडत आहे, काही कळायला मार्ग नाही. पीआयला मारहाण केल्याप्रकरणी 5 आमदार निलंबित झाले. पण, खटले फक्त दोघांवर. बाकीच्या तिघांचे काय? पोलिसाला मारण्यासाठी आमदार गेले होते, त्यांच्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही आमदार होते. सरकारने स्वतःच्या आमदारांना का निलंबित केले नाही? सीसीटीव्ही फुटेज सरकार का दाखवत नाही? आता तिघांचे निलंबन मागे घेणार आहेत. ते भाजप आणि शिवसेनेचे आहेत. बाकीच्या दोघांचे काय? राम कदम यांना माफी नाहीच. परंतु, कारवाई सर्वांवर समान झाली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी खडसावले.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अमरावतीच्या सभेत तोफ डागली. ते म्हणाले, सोनिया गांधींचे अतिशय विश्वासू म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्रात पाठविले. ते सर्व मान्य करतात. त्यांना परिस्थिती माहिती आहे. परंतु, ते काहीही करत नाहीत. आघाडीत असल्यामुळे अडचण होते, असे ते केंद्र सरकारला पत्र लिहून सांगतात. अडचण होते तर मग आघाडी केली कशाला, असा खोचक प्रश्नही राज ठाकरे यांनी केला.
महत्त्वाची खाती राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहेत. इतकी वर्षे त्यांनी काय केले? अनेक धरणांचे काम केवळ कागदोपत्री आहेत. हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च करुनही प्रकल्प अर्धवट आहेत. अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढला. हा पैसा गेला कुठे? प्रकल्पांवर खर्च करण्यात आलेले 70 हजार कोटी रुपये गेले कुठे, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
2009 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या मधल्या काळात अजित पवार यांनी हजारो कोटींचे पाटबंधारे प्रकल्प मंजूर केले. या प्रकल्पांचे कामही सुरु झाले नाही. कधी एका दिवसात 11, कधी 10 तर कधी 5 प्रकल्प होते. या सर्वांची किंमत त्यावेळी होती 25 हजार 856 कोटी रुपये. या प्रकल्पांसाठी ऍडव्हांस निधीही वाटप करण्यात आला. हे सर्व प्रकल्प विदर्भातील आहेत. यापैकी किती पैसा इलेक्शन फंड म्हणून आला असेल, याची कल्पनाच न केलेली बरी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.