आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Thackeray News In Marathi, Shiv Sena, MNS, Nitin Gadkari

शिवसेनेला नकोय, तर तुमचा आग्रह कशासाठी?, राज ठाकरेंचा भाजपला सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ‘शिवसेनेला माझे समर्थन नको असेल तर तुम्ही या भानगडीत का पडता?’, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला प्रस्ताव फेटाळला असल्याची माहिती खुद्द भाजप नेते नितीन गडकरी यांनीच गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेनेच्या मुखपत्रातून आपल्या विरोधात वापरण्यात आलेली भाषा पूर्णपणे अनुचित होती, अशी नाराजीही गडकरींनी बोलून दाखविली.


गडकरी-राज भेटीमुळे महायुतीत वादळ निर्माण झाले होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून गडकरी यांच्यावर टीकाही झाली. त्यावर गडकरी म्हणाले, ‘राज ठाकरे यांचे समर्थन अथवा त्यांना रालोआत आणण्यासाठी मी गेलो नव्हतो. मनसेने मतांचे विभाजन टाळण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरू नये, असा माझा प्रस्ताव होता. रालोआचा फायदा डोळ्यापुढे ठेऊन ही भेट घेतली होती. माझ्या अथवा गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमध्ये कुठेही वेगळेपण नाही’.


राज ठाकरे यांनी कसा प्रतिसाद दिला, या प्रश्नावर बोलताना शिवसेनेलाच माझे समर्थन नको असेल तर मी काय करु शकतो. तुम्ही या भानगडीत कशाला पडता, असे राज ठाकरे यांनी आपल्याकडे स्पष्ट केल्याचे गडकरी म्हणाले.


इट का जवाब पत्थर से..
आम आदमी पार्टीने यापुढे तोडफोड केल्यास ‘इट का जवाब पत्थरसे देंगे’ अशी आक्रमक प्रतिक्रिया गडकरी यांनी दिल्ली येथील घटनेवर व्यक्त केली. ‘आप हा अराजक पक्ष असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. हे लोक पांढ-या टोपीतील माओवादी असल्याची टीकाही त्यांनी केली. आपला कुठल्याही कायद्याची चाड नाही. कुठलेही आंदोलन करताना पोलिस परवानगी घ्यावी लागते. मात्र, ‘आप’ने कायद्यालाच हरताळ फासला आहे. या पक्षाला लोकशाहीचे रितीरिवाज मान्य नाहीत. आचारसंहिता लागू झाल्यावर मुख्यमंत्र्यांचे आदेश चालत नाहीत, अधिकार प्रशासनाकडे जातात, असे सांगत गोंधळ घालणा-या ‘आप’वर कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी गडकरी यांनी केली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा केजरीवाल यांनी घेतला. आपच्या सध्याच्या कार्यपद्धतीमुळे निवडणुकीत त्यांना खातेही उघडता येणार नाही, असे गडकरी म्हणाले.