आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdev To Campaign For BJP In Nagpur News In Marathi

अतिउत्साही भाजपने संयम राखावा; योगगुरू रामदेवबाबा यांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ‘आगामी लोकसभा निवडणुकीत यश डोळ्यापुढे दिसत असल्याने भाजपमध्ये अतिउत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे संयम बाळगला पाहिजे’, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबा यांनी रविवारी नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांना दिला.

योग संमेलनाच्या निमित्ताने ते उपराजधानीत आले होेत. या दौर्‍यात रामदेवबाबा यांनी भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्यासाठी शहरातील अनेक भागांत प्रचारही केला. रामदेवबाबा म्हणाले, ‘भाजप लोकशाही जपणारा पक्ष आहे. कुठलीही एक व्यक्ती पक्ष चालवत नाही, सामूहिक निर्णय घेतले जातात. त्यामुळे वाद उद्भवणे स्वाभाविकच आहे. मात्र, भाजपमध्ये सध्या अतिउत्साहाचे वातावरण खटकणारे असून त्यावर संयम ठेवायला हवा,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 23 मार्चला रामलीला मैदानावर योगसप्ताहाचा समारोप होणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

नागपुरात गडकरी यांच्या प्रचारासाठी एक लाख लोकांशी संपर्क केल्याचा दावा या वेळी त्यांनी केला. गडकरी जे बोलतात, ते करून दाखवतात, असा दावाही रामदेवबाबा यांनी केला.

भाजपवर नाराजी
रामदेवबाबा म्हणाले, निष्कलंक लोकांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी आपली अपेक्षा होती. त्यावर आपली नाराजी होती. या पक्षाने भ्रष्ट व चुकीच्या उमेदवारांस तिकीट दिल्यास नैतिकदृष्ट्या आपण त्याचा आजही विरोधच करणार आहोत.

एनडीएला सशर्त पाठिंबा
भाजप व एनडीएला आपले समर्थन मुद्द्यांवर आधारित आहे. नऊ मुद्द्यांचा समावेश असलेल्या शपथपत्रावर आपण भाजप, एनडीएचे नेते तसेच उमेदवारांकडून स्वाक्षर्‍या घेत आहोत. त्यात विदेशातून काळा पैसा आणणे, भ्रष्टाचारावर आळा, एकल कर व्यवस्था, सीबीआयला स्वायत्तता, राष्ट्रीय किसान आयोगाची स्थापना, गोरक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. नागपुरातील दौर्‍यात गडकरी यांनी प्रथम त्यावर स्वाक्षरी केल्याचे बाबांनी सांगितले.

राहुल गोंधळलेले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोनशे जागांचा दावा हास्यास्पद असून त्यांना 50-60 जागा मिळाल्या, तरी खूप झाले. राहुल गांधी गोंधळलेले व्यक्ती आहेत. त्यांना कुठलेही व्हिजन नाही. पराभवाच्या भीतीपोटी काँग्रेसचे अनेक महारथी निवडणूक लढायला तयार नाहीत, याकडेही रामदेवबाबांनी लक्ष वेधले.

काँग्रेसकडून आपचा वापर
केजरीवाल काँग्रेसचे एजंट असल्याचा आरोप रामदेव यांनी केला. त्यांची कथनी व करणी यात फरक आहे. केजरीवाल यांनी लोकांच्या अपेक्षांचा भ्रमनिरास केला. आता ते मोदींना शिव्या देत आहेत. काँग्रेस त्यांचा स्पीडब्रेकर म्हणून वापर करत आहेत. वाराणसीहून मोदींच्या विरोधात लढण्याची केजरीवाल यांची घोषणा म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशीच असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नवनीत राणांना पाठिंबा नाहीच
आगामी लोकसभा निवडणुकीत माझा फक्त भाजप आणि एनडीएला पाठिंबा आहे. अन्य कोणालाही नाही. त्यामुळे अमरावती येथील राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा या आपल्या समर्थनाचा दावा करत असतील, तर आपण त्याचा विरोध करतो, असे रामदेवबाबा यांनी स्पष्ट केले.