आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recognise Private Universities Threat, Governor C Vidyasagar Rao

खासगी विद्यापीठांचा धोका ओळखा, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘देशातील तरुणाईमध्ये अशक्य ते शक्य करण्याची प्रचंड कार्यक्षमता आहे. युवकांमधील सकारात्मक ऊर्जेमुळेच भारत महासत्ता म्हणून उदयास येईल,’ असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी अमरावतीत व्यक्त केला. खासगी विद्यापीठांच्या आगमनामुळे राज्यात स्पर्धा निर्माण झाली आहे. या खासगी विद्यापीठांचा धोका ओळखत राज्यातील विद्यापीठांनी उच्च प्रतीचे शिक्षण देणे गरजेचे आहे. नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीला चालना देणारी शिक्षण प्रणालीचा अवलंब करण्याचे तंत्र अवगत केले पाहिजे’, असे आवाहनही त्यांनी केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित बाराव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवा महोत्सवाच्या (इंद्रधनुष्य) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’ अभियानामध्ये देशास वैश्विक निर्मिती केंद्र बनवण्याची क्षमता आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील दहा कोटी युवकांना दरवर्षी रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळेच त्या स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी प्रत्येक स्तरावरील भागीदारी वाढवण्याची जबाबदारी आपणावर असून, ‘इंद्रधनुष्य’सारख्या कार्यक्रमांमधून युवकांमधील नेतृत्वगुण व सर्जनशीलतेच्या विकासास मदत होते, असे राज्यपाल म्हणाले.

सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच २३ कोटी युवा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंगिस्तानने यातून लोकशाहीतील सक्रिय सहभागाचाच संदेश दिला आहे. भारताला जगाची नेतृत्व करण्याची संधी मिळणार, अशी आशा आहे. त्यामुळे आपण उच्च शिक्षणाचा दर्जा उंचवायला पाहिजे. विद्यापीठांमध्ये दर्जेदार संशोधन व्हायला हवे, याबाबत आपण गंभीर असल्याचेही राज्यपाल म्हणाले. पदव्युत्तर पदवीनंतर समाजोपयोगी संशोधनावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.