आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Record Very Soon Students Number, Resolution Passed

30 सप्टेंबरपर्यंत पटनोंदणी कराच!,अध्यादेश जारी, विद्यार्थी संख्या घोटाळ्याला चाप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खासगी शिक्षण संस्थाचालकांकडून केला जाणारा विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा घोळ व वाढीव पदांच्या रूपात होणारी शासनाची आर्थिक लूट थांबवण्यासाठी सर्व शाळांना 30 सप्टेंबरपर्यंत पटसंख्या नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सद्य:स्थितीत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांत एक लाख तीन हजार 625, तर उच्च माध्यमिक शाळांमधून दोन कोटी 18 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक कार्यक्रमांचे नियोजन, सनियंत्रण व प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्धारित वेळेत विद्यार्थी व कर्मचा-यांची आकडेवारी उपलब्ध होणे गरजेचे असते. राज्य व केंद्राच्या शैक्षणिक योजनांसाठी ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची असते.
पहिली ते बारावीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना वेतन अनुदान दिले जाते. त्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची पदे निश्चित करण्यात येतात. प्राथमिक विभागातील पटनोंदणीसाठी 15 व 31 जुलै, तर माध्यमिकसाठी 15 जुलै व एक ऑगस्ट आणि उच्च माध्यमिकसाठी एक ऑगस्ट अशी मुदत ठरवून देण्यात आली होती. पटनोंदणीच्या या विविध तारखांमुळे ‘यूडीआयएसई’ प्रणालीत नमूद केलेली विद्यार्थी संख्या व पदनिश्चितीसाठी विचारात घेतलेली विद्यार्थी संख्या भिन्न आढळून येत होती. काही खासगी शिक्षण संस्था विद्यार्थी संख्या जादा दाखवून वाढीव अनुदान लाटत असत.
योजनांचे नियोजन
देशभरातील विद्यार्थ्यांची आकडेवारी संकलित करण्यासाठी केंद्र शासनाने ‘यूडीआयएसई’ ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये प्रत्येक वर्षी शाळेने 30 सप्टेंबर अखेरपर्यंत विद्यार्थी, शिक्षक, वर्गखोल्या आदी माहिती भरणे बंधनकारक केले गेले आहे. या माहितीच्या आधारेच केंद्र शासनाकडून मध्यान्ह भोजन, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, आयसीटी आदी योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.