आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Riots Effort Stopped, Chief Minister Issued Aleart

दंगलीचे प्रयत्न हाणून पाडा, मुख्यमंत्र्यांचा दिला सावधतेचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ‘जातीय दंगली झाल्या की निवडणुकांमध्ये काहींना त्याचा फायदा मिळतो. त्यामुळे मुद्दाम कुरापत काढून दंगा माजविण्याचे प्रयत्न काही पक्षांकडून होतील. मात्र त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका’, असा सावधतेचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.

नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित रामटेक लोकसभा मतदारसंघातील बूथस्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार मुकुल वासनिक, नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री नितीन राऊत यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कोणी कितीही वल्गना केल्या अथवा जनसंपर्क मोहीम राबविली तरी काँग्रेसने केलेले मूलभूत कामच महत्त्वाचे ठरणार आहे. बाबरी मशिदीची घटना घडल्यावर तेथे विरोधी पक्ष सत्तेत आला. पश्चिम महाराष्ट्रात मिरजेची दंगल झाल्यावर त्याचा फायदा विरोधी पक्षांना मिळाला, असा आजवरचा अनुभव आहे. दंगलीमुळे असुरक्षिततेचे वातावरण तयार झाल्यावर त्याचा काही घटकांना फायदा मिळतो. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशात आज तेच चालले आहे. मुद्दाम कुरापत काढण्याचे व दंगा माजविण्याचे प्रयत्न काही पक्षांकडून होतीलही. ते प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची जबाबदारी राज्य शासन पार पाडत आहे. त्यासाठीच महिनाभरापूर्वी दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली. वीजबिलाची थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांची वीज कापली जात असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची दखल घेऊन मध्यममार्ग काढण्यात आल्याचे नमूद करताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकर्‍यांनी दोन तिमाहीची बिले भरण्याची हमी दिल्यास वीज न कापण्याचे आदेश दिल्याचे चव्हाण म्हणाले.
गटबाजी चव्हाट्यावर, मुत्तेमवारांची पाठ
कॉँग्रेस नेते कितीही पोटतिडकीने आवाहन करत असले तरी या पक्षातील गटबाजी संपत नसल्याचे चित्र मंगळवारीही दिसून आले. निमंत्रण न मिळाल्याने खासदार विलास मुत्तेमवार मेळाव्यापासून दूर राहिले, खुद्द त्यांनीच ही माहिती दिली. नागपूर आणि रामटेक हे शेजारी मतदारसंघ आहेत. ‘रामटेक’च्या मेळाव्याचे निमंत्रण नागपूरचे खासदार मुत्तेमवार यांना नव्हते. यानिमित्ताने मुकुल वासनिक आणि मुत्तेमवार या दोन खासदारांमधील बेबनाव पुन्हा उघड झाला.