आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅट्रॉसिटीतील तडजोड हायकोर्टाला अमान्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात परस्पर केलेली तडजोड कायद्यान्वये अमान्य आहे. त्यामुळे गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन्ही पक्षकारांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बबन सोनटक्के हा पांडुरंग किसनराव टाले (रा. कारंजा लाड) यांच्या घरी भाड्याने राहतो. 15 जानेवारी 2013 रोजी त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. याप्रकरणी सोनटक्के याने पांडुरंग टाले याच्याविरुद्ध कारंजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरणाची शहानिशा करून टाले याच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला. दरम्यान, 26 एप्रिल 2013 रोजी टाले याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे टाले कुटुंबीयांवर दु:खाचे डोंगर कोसळले. यानंतर सोनटक्के आणि टाले यांनी तडजोड करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. प्रकरणाची सुनावणी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. चंद्रकांत भडंग यांच्यासमक्ष झाली.

पोलिस तपासात सकृत्दर्शनी गुन्हा घडल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा प्रकरणी तडजोड होणे शक्य नाही. परंतु अर्जदार आणि गैरअर्जदाराने प्रकरण संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांची विनंती काही प्रमाणात मान्य करीत न्यायालयाने सोनटक्के आणि टाले यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावून गुन्हा रद्द केला. पक्षकारांनी दंडाची रक्कम कारंजा येथील विधी सेवा समितीकडे भरावी, असे आदेश न्यायालयाने दिले.