आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचा दुजाभाव: नेत्यांचे रस्ते चकाचक, सामान्यांचा मार्ग मात्र खडतर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सामान्यांच्या मतांवर नेत्यांनी राजकारणात इमले बांधले. त्या सामान्यांना पावसाच्या पहिल्याच सरीत खडतर मार्गांवरून प्रवास करावा लागतोय. लाखो रुपये खचरून महापौर, उपमहापौर, मनपा आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील रस्ते चकाचक करण्यात आले. मात्र, शहरातील इतर भागातील रस्ते खड्डेमय झाले. महापालिकेचे प्रमुख दोन पदाधिकारी व आयुक्तांच्या घरांसमोरील रस्त्यांचा ‘दिव्य मराठी’ने आढावा घेतल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.

पदाधिकार्‍यांच्या प्रभागात ‘विकास’ इतरत्र ‘भकास’ झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील इतर रस्त्यांवर मात्र खड्डेच खड्डे आहेत. शहरातील रस्त्यांसाठी प्राप्त 20 कोटींच्या विशेष निधीचे नियोजन करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. महापौर ज्योत्स्ना गवई यांचे निवासस्थान भीमनगर येथे आहे. महापौरांच्या घरासमोरील व त्यांच्या प्रभागातील रस्ते अतिशय चांगले आहेत; पण शहरातील इतर रस्ते मात्र खड्डय़ात गेल्याचे चित्र सर्वत्र आहे. उपमहापौर रफिक सिद्दीकी यांच्या आझादनगरातील घरासमोरील रस्ता चकचकीत आहे. महापालिकेचे आयुक्त दीपक चौधरी राहत असलेल्या बंगल्यासमोरील रस्ता नुकताच गुळगुळीत झाला आहे.

सावधान! येथे खड्डे
आकाशवाणीसमोर, सिव्हिल लाइन्स रोड, नेकलेस रोडवर खंडेलवाल ज्वेलर्स समोर, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट चौक, रेल्वे स्टेशन रोड, गांधी चौक, कौलखेड चौक, गुरुनानक विद्यालयासमोर, स्कायलार्क हॉटेल समोर, न्यू ईरा शाळेसमोर, जुने शहर पोलिस स्टेशन समोर, आरएलटी कॉलेज समोर, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, सार्वजनिक बांधकाम विभाग समोर.

इतर भागातील रस्त्यांचा प्रश्न निकाली काढू
शहरातील इतर रस्त्यांचा प्रश्न निकाली काढणार असून, पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे सुरू होतील. केवळ महापौरांच्या घरासमोरील रस्ता चांगला आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. शहरातील इतर प्रभागातही चांगले रस्ते आहेत. भारिप-बमसं शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
- ज्योत्स्ना गवई, महापौर

हे तर प्रशासनाचे काम
रस्ते दुरुस्ती व देखभाल हे प्रशासनाचे काम आहे. शहरातील रस्त्यांसाठी 20 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पण, त्या निधीचे नियोजन करण्यात प्रशासन गेल्या चार महिन्यांपासून अपयशी ठरले आहे. केवळ आपल्या घरासमोरील रस्ता चांगला असल्याची बाब मला मान्य नाही.
-रफिक सिद्दीकी, उपमहापौर

रस्त्यावर मुरमाचे ढीग
जुना इन्कम टॅक्स चौक ते रामलता स्क्वेअर या चौकांना जोडणार्‍या रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये मुरूम टाकण्यात आला आहे. परंतु, खड्डा मुरमाने भरण्यासाठी कुठलीही उपाययोजना महापालिकेने केली नाही. रस्त्यावर ट्रकने मुरमाचा ढीग रचला असून, तो गेल्या चार दिवसांपासून तसाच असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

निधी परतीच्या मार्गावर
सुवर्ण जयंती शहरी योजनेंतर्गत मिळालेला एक कोटी रुपयांच्या निधीतून खडीकरण, डांबरीकरण करण्याची तरतूद आहे. पण, महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा निधी परत जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. प्रशासनातील अधिकारी हा निधी परत जाण्यासाठी प्रयत्न करत असून, तो थांबवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही.

आयुक्तांचा ‘नो रिस्पॉन्स’
महापालिका आयुक्त दीपक चौधरी व बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांच्याशी या रस्त्याच्या कामाच्या दुजाभावाबाबत पालिका प्रशासनाचे अधिकारी म्हणून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आयुक्त चौधरी महापालिकेत उपस्थित नसल्याने महापालिकेची बाजू समजू शकली नाही.