आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत दोन लक्ष्मी मूर्तींसह सव्वा पाच लाखांचे दागिने लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- लक्ष्मीपूजनानंतर मध्यरात्री श्यामनगर चौकातील उद्योजकाच्या घरातून पूजेत ठेवलेल्या चांदीच्या दोन लक्ष्मी मूर्तींसह कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड लंपास करण्यात आले.सव्वापाच लाखाच्या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सुमीत रामनिवास खंडेलवाल (34) यांचा श्यामनगरच्या मुख्य मार्गावर बंगला आहे. एमआयडीसीमध्ये त्यांची गोपी इंडस्ट्रीज ही त्यांची रसायनाची फॅक्टरी आहे. त्यांच्या संयुक्त कुटुंबात आई-वडील, भाऊ, काका, पुतणे असे सर्व एकाच घरात राहतात. खाली आणि वर अशा दोन माळ्यांवर त्यांचे वास्तव्य आहे. खाली असलेल्या सात खोल्यांपैकी दोन खोल्यांमध्ये लक्ष्मीपूजन करण्यात आले. त्यासाठी लक्ष्मीमातेची प्रत्येकी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती दोन पूजांवर ठेवली होती. लक्ष्मीपूजनामुळे बंगल्यातील सर्व दिवे लागले होते. मुख्य दरवाजा बंद होता, तर सर्व्हिस गल्लीला लागून असलेला लोखंडी दरवाजाला कडी लागलेली होती. एरवी सुरक्षेच्या दृष्टीने त्या दरवाज्याला कुलूप लावलेले असते. मात्र, रविवारी त्या दरवाज्याला कुलूप नव्हते. चोरटे त्याच दरवाज्यातून घरात आले. त्यांनी दोन्ही पूजेवरील लक्ष्मी मूर्ती तसेच सुमीत यांच्या शयनकक्षातील लाकडी आलमारीमधील सोन्याच्या बांगड्या, अंगठी, मंगळसूत्र, 25 हजार रोख आणि दोन महागडे मोबाइल असा एकूण पाच लाख 29 हजारांचा ऐवज घेऊन पळ काढला. चोरटे घरात असल्याची कुणकुण लागल्याने सुमीत यांना जाग आली. त्यांनी आरडाओरड करताच चोरट्यांनी पळ काढला. त्यांनी सोबत आणलेले गुप्तीसारखे शस्त्र खंडेलवाल यांच्याच घरात ठेवले. ते शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे. ही चोरी रविवारी रात्री तीनच्या दरम्यान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चोरीची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी उपायुक्त संजय लाटकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम, फ्रेजरपुराचे ठाणेदार रियाजोद्दीन देशमुख यांनी खंडेलवाल यांच्या घरी जाऊन पाहणी केली. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

चोरीला गेलेला ऐवज
चांदीच्या मूर्ती दोन किलो
मंगळसूत्र 55 ग्रॅम 1 लाख 60 हजार
बांगड्या 50 ग्रॅम 1 लाख 50 हजार
दोन अंगठ्या 50 हजार
रोख 25 हजार
दोन मोबाइल 40 हजार

बंगल्यात 22 सदस्य
खंडेलवाल कुटुंबात एकूण 22 सदस्य आहेत. खाली सात आणि पहिल्या माळ्यावर जवळपास नऊ खोल्यांचे हे प्रशस्त घर. या घरात सुमीत त्यांचे आई-वडील, भाऊ अमित, रामविलास खंडेलवाल, तपीश खंडेलवाल, नीलेश खंडेलवाल, पवन खंडेलवाल आदी राहतात.