नागपूर - रस्त्याचा दर्जा कसा आहे, डांबरीकरणाचे थर किती जाडीचे आहेत, किती खड्डे आहेत, रस्त्याच्या कडेला अतिक्रमणाचे, वृक्षारोपणाचे स्वरूप आणि प्रमाण कसे आहे, वाहतुकीच्या दृष्टीने मार्ग कितपत सुरक्षित किंवा अपघातप्रवण आहे, यासह अनेक विषयांचा अचूक डेटा उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) अाणले अाहे. देशातील राष्ट्रीय महामार्गांचे अद्ययावत सर्वेक्षण करण्याबराेबरच निकृष्ट काम करणा-या ठेकेदारांना चाप बसवण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत हाेणार अाहे. सुमारे तीन हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांच्या सर्वेक्षणाचा पायलट प्रकल्प प्राधिकरणाने हाती घेतला असून त्याची सुरुवात नागपुरातून होत आहे.
प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक अतुलकुमार यांनी रविवारी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. रोड मेजरमेंट डेटा अॅक्विझिशन सिस्टिम (रोमडास) असे या तंत्रज्ञानाचे नाव असून ते न्यूझीलंडच्या कंपनीने विकसित केले आहे. सरकार या तंत्रज्ञानासाठी तब्बल १६ काेटी रुपये माेजणार अाहे. सध्या जगाच्या पाठीवरील ७५ देशांमध्ये हे अद्ययावत तंत्रज्ञान वापरले जात आहे.
तीन हजार किमीच्या पायलट प्रकल्पाची नागपुरातून सुरुवात
फायदा काय?
>या तंत्रज्ञानातून एक प्रकारे संपूर्ण रस्त्याचा एक्स-रे उपलब्ध होऊ शकेल.
>रस्त्याचा दर्जा, डिझाइन, डांबरीकरणाचे थर व त्याचे स्वरूप, रस्त्यावरील खड्डे, सदोष रचना याची शास्त्राेक्त माहिती मिळेल.
>अतिक्रमण, वृक्षारोपण, अपघातप्रवण बाबी, दुभाजकाची रचना, पुलांची स्थिती याविषयीची खडान् खडा डेटा उपलब्ध हाेईल.
>निविदा काढताना, कामातील दोष उघड करण्यासाठी तंत्रज्ञान फायदेशीर. त्यामुळे रस्ते बांधकामातील भ्रष्टाचाराला चाप लावणे शक्य.
काय अाहे ‘राेमडास’ ?
एका वाहनावर शक्तिशाली ३ व्हिडिओ कॅमेरे आणि १३ सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. हे वाहन रस्त्यावरून जाताना कॅमेरे व सेन्सरच्या साह्याने संपूर्ण रस्त्याचा खडान््खडा डेटा वाहनातीलच संगणकात स्टोअर होतो. हे वाहन जीपीएसच्या माध्यमातून थेट गगन या उपग्रहाशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे हा डेटा थेट प्राधिकरणाच्या वेबसाइटवर उपलब्ध हाेऊ शकेल. तसेच तो सर्वसामान्यांच्या मोबाइल अॅपवरदेखील पाहता येईल. वाहन एखाद्या रस्त्याने फिरवल्यावर सुमारे दीडशे किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा एका बाजूचा डेटा दिवसाला गोळा करण्याची या तंत्रज्ञानाची क्षमता आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या बारीकसारीक बाबींचा डेटाही विनासायास उपलब्ध हाेऊ शकताे.
कुणाला उपयोगी ?
वाहतूक मंत्रालयासह अर्थ मंत्रालय, महामार्ग प्राधिकरण, राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग, पतपुरवठा संस्था, विकासकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही एका क्लिकवर उपलब्ध होणारा हा डेटा अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. सर्वसामान्यांना तो मोबाइल अॅपवरही भविष्यात उपलब्ध होणार आहे.
भ्रष्टाचाराला चाप
रस्त्यांच्या कामात हमखास होणा-या भ्रष्टाचाराला चाप लावण्यात या तंत्रज्ञानाची मोठीच मदत होणार असून कंत्राटदारांचे पितळच उघडे पडण्यास मदतच हाेणार आहे. अाम्ही त्याचा जास्त वापर करू.
-नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री
राज्यातही उपयाेग करू
महाराष्ट्रातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करण्याचे आमचे प्रयत्न राहतील.
-चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र