आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाला लक्ष्य केल्यानेच परिवार काँग्रेसविरोधात एकवटला; मा.गो.वैद्य यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- काँग्रेसने आणीबाणीनंतर प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. मंत्र्यांनी, नेत्यांनी वाट्टेल ते आरोप संघावर केले. आपली राजकीय लढाई भाजपशी नव्हे, संघाशी आहे, असा विखारी प्रचारही केला. यातून दुखावल्या गेलेल्या संघ परिवारातील सर्व संघटना काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी सक्रियपणे एकत्र आल्या. देशभरात काँग्रेसच्या दारुण पराभवामागील अनेक कारणांपैकी हे एक महत्त्वाचे कारण आहे, असे मत संघाचे माजी अखिल भारतीय प्रचार प्रमुख मा. गो. वैद्य यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

भाजपविरोधी पक्षांच्या संघविरोधाचा विजयात वाटा : संघ परिवारातील संघटना काँग्रेसच्या विरोधात एकत्र येण्याचे र्शेय काँग्रेसलाच आहे, असा निष्कर्ष काढून वैद्य म्हणाले, ‘पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने संघाला लक्ष्य करणे सुरू केले. काँग्रेसची राजकीय लढाई जणू संघाशीच आहे, असा प्रचार मोठय़ा प्रमाणात केला गेला. दिग्विजयसिंह यांच्यासारख्या नेत्याने सातत्याने वाट्टेल तसे आरोप केले. केंद्रातील एका मंत्र्याने मोदींना आरएसएस चा गुंडा म्हणून संबोधले. संघाला गोळवलकर संप्रदाय म्हणून हिणवले गेले. संघाचा धाक दाखवून मुस्लिम मतांसाठी स्पर्धा लागली. या आघातांपायी संघच नव्हे तर परिवारातील संघटनाही दुखावल्या जाणे स्वाभाविक होते. त्यामुळे सर्वच्या सर्व 32 संघटना सक्रीयपणे काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी देशभरात कामाला लागल्या. संघाला त्यासाठी सांगावे लागले नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्रदीपक यशात भाजपविरोधी पक्षांच्या संघविरोधाचाही वाटा आहे. याशिवाय मोदींनी प्रचारासाठी घेतलेले कष्ट, नव मतदारांमधील अभूतपूर्व जागृती ही देखील यामागील कारणे आहेत.

मतदानापुरते आवाहन
संघ नेतृत्वाने सुरुवातीला केवळ शतप्रतिशत मतदानाचा विचार मांडला होता. नेतृत्वाने दिलेला हा संकेत स्वयंसेवकांसाठी पुरेसा होता. पडद्याआड राहून स्वयंसेवकांनी बुथस्तरापर्यंत काम केले. त्याचा परिणाम मतदानाचा टक्का 66 टक्क्य़ांच्या वर जाण्यात झाला, असे वैद्य म्हणाले.

सरकारमध्ये हस्तक्षेप नाही
केंद्रात मोदींचे सरकार आले असताना आर्थिक धोरणावर संघ आणि भाजपमधील टोकाच्या मतभेदांवर बोलताना वैद्य यांनी सावध भूमिका घेतली. नव्या सरकारचे धोरण अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे आताच त्यावर बोलणे योग्य ठरणार नसल्याचे सांगून वैद्य म्हणाले, रालोआच्या आर्थिक जाहीरनाम्यातील मुद्यांवर मतभेद असण्याचे कारण नाही. सरकार म्हणून भाजपला निर्णय घेण्याची मोकळीक आहे. तर परिवारातील संघटना आपापल्या विषयांवर त्यांची बाजू मांडायला मोकळ्या आहेत. त्यात संघाकडून परवानगी वगैराचा प्रश्नच नाही. साऱ्याच संघटना स्वायत्त आहेत. मात्र, संघाच्या दरवर्षी होणाऱ्या प्रतिनिधी सभेत संघटना अहवाल मांडत असतात.अनेक मुद्यांवर चर्चा होते. संघटना स्वतंत्रपणेच आपल्या अपेक्षा मांडत असतात. त्यात कुठेही संघाचा हस्तक्षेप नसतो, असा दावाही वैद्य यांनी केला.

अपेक्षांचे ओझे
मोदींच्या सरकारवर स्वाभाविकपणे अपेक्षांचे ओझे असेल. विविध क्षेत्रांत काम करणार्‍या परिवारातील संघटना समाजाच्या अपेक्षा मांडतील. मात्र, त्यावर सरकारलाच निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यात कुणी हस्तक्षेप करण्याचे कारणच नाही.

दोन ध्रुवीय राजकारण
अनेक पक्ष मिळून तयार होणार्‍या आघाड्या, आघाडी सरकारला देशाचा गाडा चालविण्यात येणार्‍या र्मयादा लक्षात घेता देशात यापुढे दोन ध्रुवीय (बायपोलर) राजकारणाला वाव मिळाला पाहिजे. त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.

काँग्रेसने घराणेशाहीतून बाहेर यावे
काँग्रेसचा कारभार गांधी घराण्याच्या अवतीभोवती चालतो. सध्याचे नेतृत्व पक्षाला उभारी देऊ शकत नाही. नव्या पिढीला घराणेशाही अमान्य आहे. त्यामुळे काँग्रेसला भविष्यात गांधी घराण्याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. काँग्रेसने नव्या नेतृत्वाचा विचार केला पाहिजे, असा सल्लाही वैद्य यांनी दिला.