आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS Chief Mohan Bhagwat Attacks Pm Manmohan Sing And Upa Government

पाकिस्‍तान, चीनला उत्तर देण्‍यास सरकार असमर्थः सरसंघचालकांचा हल्‍लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्‍यावर कडाडून टीका केली. पाकिस्‍तान आणि चीनला उत्तर देण्‍यासाठी सरकारकडे धोरण नाही. पंतप्रधान तिकडे पाकिस्‍तानच्‍या पंतप्रधानांची भेट घेतात आणि इकडे सीमेवर घुसखोरी होते. आपल्‍या पंतप्रधानांचा अपमान होतो आणि सरकार गप्‍प राहते, अशी टीका भागवत यांनी केली.

संघाच्‍या विजयादशमी सोहळ्यानिमित्त नागपुरात रेशिमबाग मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारच्‍या धोरणांवर कडाडून हल्‍ला चढविताना भागवत म्‍हणाले, मोठ्या प्रमाणात अल्‍पसंख्‍यांकांचे तुष्‍टीकरण केले जात आहे. ज्‍या पद्धतीने देशाच्‍या गृहमंत्र्यांनी तथाकथित अल्‍पसंख्‍यांच्‍या बाबतीत नरमाईने राहण्‍याच्‍या सूचना राज्‍यांना दिल्‍या आहेत. त्‍यातून हिंदू समाजाच्‍या उपेक्षेचे धोरण पुढे येते. घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांची अवहेलना करुन जातीयवादी आधारावर आरक्षण देण्‍याची तयारी सुरु केली आहे. करदात्‍यांचा हिस्‍सा भ्रष्‍टाचारी योजनांसाठी वापरुन देशाचा खजिना रिकामा करण्‍यात येत आहे.

सरसंघचालक म्‍हणाले, केवळ सत्ता स्‍वार्थ साधण्‍यासाठी देशभक्त शक्ती चिरडून टाकण्‍याच्‍या विषघातक राजकारणाचे दुसरे उदाहरण म्‍हणजे मुजफ्फरनगरची घटना आहे. एका समुदायाच्‍या गुंडागर्दीच्‍य घटनांनी सत्ता समीकरणासाठी केवळ उपेक्षाच नव्‍हे तर गुंडागर्दीला प्रोत्‍साहनही देण्‍यात आले. कायदा आणि घटनेला बाजूला सारुन कथित अल्‍पसंख्‍यांकांच्‍या तुष्‍टीकरणासाठी स्‍पर्धा यापूर्वीही सुरुच होती. जम्‍मूतील किश्‍तवाड येथे हिंदू अल्‍पसंख्‍यांकांवर हल्‍ला करण्‍यात आला. राज्‍याच्‍या गृहमंत्र्यांसमोर त्‍यांची लुटमार झाली. काश्मिरमध्‍ये हिंदूंवर अत्‍याचार झाले. हीच परिस्थिती आता जम्‍मूत निर्माण होत आहे. केंद्र सरकारचे धोरण अशा शक्तींचे लांगूलचालन करणारे आहे.

भागवत यांनी दहशतवादाचा सामना करण्‍यास सरकारचे धोरण कुचकामी असल्‍याची टीका केली. ते म्‍हणाले, भारतात नेपाळमार्गे दहशतवादी येऊन भारताचे जनसंतुलन बिघडविण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहेत. पाकिस्‍तानी पासपोर्टवर हे दशहवादी नेपाळमध्‍ये जातात. तिथून ते भारतात शिरतात. हे रोखण्‍यात सरकारला अपयश येत आहे. चीनचे दोन्‍ही बाजुने भारतावर अतिक्रमण करण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहे. त्‍याला उत्तर देण्‍यासाठी सरकार असमर्थ असल्‍याचे भागवत म्‍हणाले.

निवडणुकांबाबत भागवत म्‍हणाले, निवडणुकीचे नाव जरी मी घेतले तरी माझ्यावर राजकारणाचा आरोप होतो. संघ राजकारण करत नाही. संघाच्‍या कामाच्‍या आड राजकारण येते. एक तात्‍कालित कर्तव्‍य आमच्‍यासमोर आहे. लोकशाही, निवडणुका आणि निवडणूक लढविणा-यांसाठी राजकारण हा विषय आहे. पण, तुमच्‍या आणि माझ्यासारख्‍या सर्वसामान्‍यांसाठी निवडणूक हे राजकारण नाही. ही कर्तव्‍य पार पाडण्‍याची संधी आहे. आपल्‍याला लवकरच मतदानाद्वारे कर्तव्‍य पार पाडायचे आहे. त्‍यासाठी मतदार यादीत नाव आहे, की नाही हे तपासून पाहा. मतदानासंदर्भातील उदासिनता बाजूला सारुन सर्वांनी मतदान केले पाहिजे.