आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणुकीत शत-प्रतिशत मतदानासाठी देशभरात संघ दक्ष!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय विचारांच्या शक्तींकडे नेतृत्व सोपवण्यासाठी शत-प्रतिशत मतदानाचे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवात केले होते. त्यानुसार शत-प्रतिशत मतदानाच्या प्रचारासाठी देशभरात संघाची चारस्तरीय स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली आहे. प्रत्येकाने मतदान करणे कसे आवश्यक आहे, हे पटवून देण्याचे प्रयत्न स्वयंसेवकांकडून होत असून राष्ट्रीय स्तरावरील मुद्देही सूचकपणे मतदारांपुढे मांडले जात आहेत.

आजवरच्या प्रत्येकच निवडणुकीत भाजपच्या प्रचारात संघाच्या स्वयंसेवकांचा मोठा वाटा राहिलेला आहे. मात्र, या वेळी ‘नमो मिशन’साठी संघाचा सहभाग अभूतपूर्व असाच असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांनी केलेल्या शत-प्रतिशत मतदानाच्या आवाहनावर संघाने देशव्यापी प्रचाराची योजना हाती घेतली आहे. ही योजना कार्यान्वित करण्याची जबाबदारी निवडक संघ अधिकारी आणि स्वयंसेवकांवर सोपवण्यात आली आहे. मात्र, ती प्रत्यक्ष संघाच्या नावाने राबवली जात नसून प्रत्येक मतदारसंघाच्या स्तरावर त्यासाठी स्वयंसेवी संस्था स्थापन करण्यात आली आहे.

संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात जनकल्याण परिषदेच्या नावावर प्रचाराची यंत्रणा उभी झाली आहे. त्यासाठी महानगर, विधानसभा क्षेत्र, वस्ती आणि मोहल्ला असा चार स्तरांवर प्रचाराची अंमलबजावणी करणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

मागील दोन आठवड्यात या चारही स्तरांवरील बैठका आटोपल्या असून त्यात स्वयंसेवकांना वस्तीनिहाय कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.

घरोघरी पत्रके वाटप
स्वयंसेवकांकडून घरोघरी शत-प्रतिशत मतदानाचे पत्रक वाटले जात आहे. काही राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. राष्ट्रवादी विचारांचे सरकार केंद्रात स्थापन होण्याची कशी गरज आहे, हेदेखील पटवून देण्याचे प्रयत्न स्वयंसेवकांकडून होत आहेत. अर्थात त्यात ‘भाजपला मतदान करा’, असा थेट उल्लेख शक्यतोवर टाळला जात असल्याची माहिती संघाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

श्रेणीनिहाय बैठका
संघाच्या प्रचार विभागाच्या यादीत 110 र्शेणी (व्यावसायिकांचा) समावेश आहे. त्यात प्रामुख्याने डॉक्टर, अभियंते, वकील, शिक्षक, व्यापार्‍यांसह सर्वच व्यावसायिकांचे गट पाडण्यात आलेले आहेत. विदर्भात 10 एप्रिल रोजी मतदान असल्याने 1 ते 9 एप्रिल दरम्यान या सर्व व्यावसायिकांच्या बैठका घेऊन त्यांना मतदानाचे, राष्ट्रीय विचारांच्या सरकारचे महत्त्व पटवून दिले जाईल. देशभरात याच पद्धतीने शत-प्रतिशत अभियानाची अंमलबजावणी होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.