आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSS News In Marathi, Mohan Bhagwat, Divya Marathi, Nagpur

संघाचे आजपासून ‘निवडणूक चिंतन’, परिवाराच्या संघटनांचा सरसंघचालक घेणार वर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील भाजपसह सर्वच संघटनांची राज्यस्तरीय वार्षिक समन्वय बैठक शनिवारपासून दोन दिवस नागपुरात सुरू होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होणार्‍या या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. त्यात ते आदर्श संघटनकौशल्य तसेच मूल्याधारित राजकारणाचे धडे संघटनांना देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरवर्षी नियमितपणे या राज्यस्तरीय चिंतन बैठकीचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षी ही बैठक मुंबईत पार पडली होती. या वर्षी ती नागपुरात रेशीमबाग परिसरात होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही संघ परिवाराच्या सहभागाबाबतचे दिशानिर्देश मिळू शकतात, अशी माहिती संघ परिवारातील सूत्रांनी दिली.

धोरणात्मक निर्देश देणार
शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चालणार्‍या या बैठकीत सुरुवातीला परिवारातील संघटनांच्या मागील वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय आगामी वर्षभरात राज्यात परिवारातील संघटनांकडून राबवल्या जाणार्‍या उपक्रमांची माहिती संघटनांच्या प्रमुखांकडून सादर होणार आहे. त्यावर संघ नेत्यांकडून संघटनांना धोरणात्मक दिशानिर्देश दिले जातील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

32 संघटनांचे प्रतिनिधी
भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, संस्कार भारती, ग्राहक पंचायत, भारतीय मजदूर संघासह 30 ते 32 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी राहतील. भाजपच्या वतीने विरोधी पक्षनेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, संघटनमंत्री रवींद्र भुसारी, उपाध्यक्ष नीता केळकर तसेच अलीकडेच भाजपच्या कोअर कमिटीत पदार्पण झालेल्या पंकजा मुंडे-पालवे आदी नेते सहभागी होणार आहेत. संघाच्या वतीने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी आणि विदर्भ या महाराष्ट्रातील चारही प्रांतांचे अधिकारी बैठकीत उपस्थित राहणार आहेत. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ही चिंतन बैठक सुरू होणार आहे. रविवारी सायंकाळी या बैठकीचा समारोप होणार आहे.

संघ परिवार पुन्हा होणार निवडणुकीत सक्रिय?
लोकसभा निवडणुकीत संघ परिवार भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याचा पक्षाला चांगला फायदाही झाला. देशात भाजपची सत्ता आली. तर महाराष्ट्रात भाजपसह युतीचे संख्याबळ वाढले. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीसाठीदेखील संघ परिवाराचे सामूहिक डावपेच या बैठकीत ठरवले जाण्याची शक्यता भाजपमधील सूत्रांनी व्यक्त केली.