आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • RTO Checkpost Now Connecting To Mantralaya By Satalite

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरटीओचे 22 चेकपोस्ट उपग्रह आधुनिक यंत्रप्रणालीने थेट मंत्रालयाशी जोडले जाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राज्यातील आरटीओचे 22 चेकपोस्ट उपग्रह आधुनिक यंत्रप्रणालीने थेट मंत्रालयाशी जोडण्याच्या कामाने वेग घेतला आहे. यापैकी दोन चेकपोस्टचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित 20 चेकपोस्टचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई-गुजरात मार्गावरील आच्छाडा आणि सोलापूर-विजापूर मार्गावर नांदणी या दोन तपासणी नाक्यांवर संगणकीकरणाची आधुनिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.


बांधा, वापरा अणि हस्तांतरित करा या योजनेद्वारे एका खासगी कंपनीला चेकपोस्ट आधुनिकीकरणाचे काम सोपवण्यात आले आहे. यामुळे सीमावर्तीय भागातून महाराष्ट्रात होणा-या वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे अधिक सोईचे होईल, तर प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार कमी होण्यास मदत करणारी ही व्यवस्था असणार आहे.


सर्वच वाहनांवर वॉच
तपासणी नाक्यांवर येणा-या वाहनाची कागदपत्रांसह सखोल तपासणी करण्याची यंत्रणा संगणकातील सॉफ्टवेअरमध्ये विकसित करण्यात आली. राज्यातील 22 नाक्यांवर होणा-या वाहनांच्या दैनंदिन नोंदीचा तपशील परिवहन आयुक्तांना ऑनलाइन दिसणार आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही नाक्यावर नोंद केलेल्या ट्रकचा तपशील राज्यातील सर्व नाक्यांवरील संगणकामध्ये बघता येईल.


एचडी कॅमेरे बसवणार
कोणताही वाहनचालक अन्य नाक्यावर गेला किंवा दुस-यांदा त्याच तपासणी नाक्यावर आला, तर त्या वाहनाचा विस्तृत तपशील या नव्या यंत्रणेमुळे लगेचच उपलब्ध होईल. सर्व तपासणी नाक्यांवर हाय डेफिनेशन (एचडी) कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे या सर्व कॅमे-याच्या मदतीने मंत्रालयात 22 एलसीडी स्क्रीनवर सर्व तपासणी नाक्यांचे थेट प्रक्षेपण अधिका-यांना बघता येणार आहे.


अशी होईल वाहनांची नोंद
वाहनाच्या कागदपत्रांचे नाक्यावर संगणकात स्कॅनिंग करण्यात येईल. यात फिटनेस प्रमाणपत्र, आरसी बुक, टॅक्स रसीद, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र, वाहनचालकाचा परवाना आणि मालाचे वजन, इत्यादी नोंद करण्यात येईल. तपासणी नाक्यावरील प्रत्येक हालचाल कॅमे-यात कैद होणार आहे.


भ्रष्टाचाराला लगाम शक्य
तपासणी नाके थेट मंत्रालयाशी जोडल्या गेल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिका-यांवर होणारे भ्रष्टाचाराचे प्रमाण व आरोप कमी होतील. ट्रकचालकासोबत होणारे सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने मंत्रालयातील अधिका-यांना बघता येतील.’’
मनोज ओतारी, एआरटीओ, अमरावती