आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळू माफियांनी केली सरपंचाची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- वाळू माफियांनी भंडारा जिल्ह्यातील मोहगाव (देवी) येथील सरपंचांना दारूतून विष पाजले. परंतु विष संपूर्ण शरीरात पसरल्याने गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. पुंडलिक बिजारात लेंडे (57) असे मृत सरपंचांचे नाव आहे.

परिसरातील सूर नदीच्या पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून जेसीबीच्या सहाय्याने वाळूचे अवैध उत्खनन सुरू होते. त्याला येथील तहसीलदार, पोलिस प्रशासनाचे अभय असल्याने अवैधपणे वाळू उपसा करणा-यांवर कारवाई करण्यात येत नव्हती. अवैध वाळू वाहतुकीमुळे मोहगांव (देवी) परिसरातील रस्ते खराब झाले होते. त्यामुळे सरपंच पुंडलिंक लेंडे यांनी ग्रामपंचायतीत एक ठराव पारित अवैध वाळू उत्खननावर आळा घालण्याचा निर्णय घेतला. यासाठी सूर नदीला जोडणा-या दोन्ही मार्गावर लोखंडी खांब लावून अवजड वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे रेती माफिया चिडले. याच कारणावरुन वाळू माफिया आणि पुंडलिक लेंडे यांच्यात 18 ऑगस्ट रोजी जोरदार भांडण झाले होते.

वाळू माफियांनी ग्रामपंचायतीतील काही लोकांना हाताशी धरुन त्यांना एका बिअर बारमध्ये बोलावले. या ठिकाणी त्यांना दारुतून विष पाजले. त्यांना त्यांना नागपुरातील केअर रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु संपूर्ण शरीरात विष भिनल्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. गुरुवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

तिघांना अटक, तहसीलदार निलंबित : जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती दिली. तर विभागीय उपअधिकारी विनोद हरकंडे यांनी मोहाडीचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावर कारवाई करीत त्यांना निलंबित केले.

भंडारा-तुमसर मार्गावर रास्ता रोको : सरपंचांच्या मृत्यूची बातमी समजताच गावक-यांनी संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी भंडारा-तुमसर मार्गावर शुक्रवारी रास्ता रोको केला. हा मार्ग सहा तास बंद होता. संतप्त जमावास नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.