आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangh Parivar Once Again On Agitation Move, Clear Signal In Amravati Meeting

संघ परिवार पुन्हा आंदोलनाच्या वळणावर, अमरावतीतील मंथन बैठकीत संकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघ परिवार पुन्हा एकदा आंदोलनाच्या वळणावर येणार, असे स्पष्ट संकेत अमरावती येथील मंथन बैठकीतून मिळाले आहेत. राममंदिराचा विषय त्यासाठी अग्रस्थानावर ठेवला जाईल, असे संकेत सध्या मिळत आहेत.


अमरावती येथे क्षेत्र आणि प्रचारकांच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने संघ परिवाराचे मंथन सुरू आहे. या मंथनाच्या माध्यमातून संघकार्याचा विस्तार वाढवण्याच्या नव्या कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. संघ शाखांची संख्या वाढविणे, तरुण वर्गाला अधिकाधिक आकृष्ट करण्याच्या दृष्टीने काही वेगळ्या उपक्रमांची आखणी आदी महत्त्वाच्या बाबींवर मंथन होत आहे. मात्र, पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुका व त्या दृष्टीने परिवाराने करावयाची तयारी हा एक महत्त्वाचा विषय बैठकीत चर्चिला जात आहे. अर्थात, त्यावर कुठलाही निर्णय आताच अपेक्षित नाही; पण ऑक्टोबरमध्ये कोची (केरळ) येथे होणा-या संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठोस निर्णय अपेक्षित आहे आणि त्याचीच पूर्वतयारी या बैठकीत केली जात आहे.


विहिंपचे मिशन : या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार करण्याची जबाबदारी विश्व हिंदू परिषदेकडे असेल, असे स्पष्ट संकेत आहेत. विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांनी याबाबत खुलासा करताना पुढील दिशा स्पष्ट केली आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सर्वपक्षीय खासदारांच्या गटांना अयोध्या मुद्याची तांत्रिक माहिती सादर करणे आणि त्या माध्यमातून केंद्रावर दबाव आणण्याचे प्रयत्न होणार असल्याचे तोगडिया यांनी स्पष्टच सांगितले आहे. केंद्र सरकारने आदेश काढून रामजन्मभूमी हिंदूंना सोपवावी, अशी स्पष्ट भूमिका मांडली जाणार आहे. परिवाराकडून रामजन्मभूमीचा विषय पुन्हा ऐरणीवर आणण्याचे प्रयत्न होणार असले तरी भाजपला मोदींची विकास पुरुष प्रतिमा आणि कट्टर हिंदुत्व या मुद्यांवर ताळमेळ साधण्याची कसरत करावी लागेल, असे मतही परिवारातील नेत्यांकडून खासगीत मांडले जात आहे.

मोदींचा निर्णय भाजपच घेणार
मोदींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार की कसे, या चर्चेला मंथन बैठकीपूर्वीच वेग आला होता. संघ नेत्यांनी मात्र असा कुठलाही निर्णय अपेक्षित नसल्याचे स्पष्टच सांगितले. भाजपने कोणाच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवायची, याचा निर्णय त्या पक्षानेच घ्यावा, अशी भूमिका अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी मांडली आहे. राजकीय लाभ आणि तोट्याचे अंदाज राजकीय पक्षांनाच लावता येतात, असा तात्विक आधारही त्यांनी वक्तव्याला दिला.


राममंदिराचा मुद्दा अजेंड्यावर
हरिद्वार येथे कुंभमेळ्यातील संत संमेलनाने पुन्हा राममंदिर आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे मंदिर उभारणीचा मुद्दा येत्या काळात संघ परिवाराच्या अजेंड्यावर असेल. प्रचारकांच्या बैठकीची माहिती देताना संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी माध्यमांशी बोलताना याचे स्पष्ट संकेत दिले. परंतु त्याच्या आंदोलनाचे स्वरूप ऑक्टोबरमध्ये होणा-या बैठकीतच स्पष्ट होईल. मंदिराच्या जागेबाबत राजकीय तसेच कायदेशीर तरतुदीतून मार्ग काढावा, अशी संघाची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.