आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sant Gadge Baba University Answer Sheet Checking Issue

आधी नापास, नंतर पास; परीक्षा विभागाचा असाही गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभियांत्रिकी विद्याशाखेच्या एका विद्यार्थिनीला विद्यापीठाने आधी नापास नंतर पास केले. कामकाज सुधारण्यासाठी अभाविपने घंटानाद आंदोलन करून कुलगुरूंशी चर्चा केली. - Divya Marathi
अभियांत्रिकी विद्याशाखेच्या एका विद्यार्थिनीला विद्यापीठाने आधी नापास नंतर पास केले. कामकाज सुधारण्यासाठी अभाविपने घंटानाद आंदोलन करून कुलगुरूंशी चर्चा केली.
अमरावती - अभियांत्रिकी विद्या शाखेच्या एका विद्यार्थिनीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आधी नापास, तर नंतर त्याच परीक्षेत पास केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या या गोंधळामुळे विद्यार्थिनीला मात्र एका शैक्षणिक वर्षाला मुकावे लागले. परीक्षा विभागातील या गंभीर प्रकाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठात शुक्रवारी (दि. १७) घंटानाद आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

विद्यापीठातील गुणवाढ प्रकरण पोलिसांत गेले असतानाच परीक्षा विभागातील गोंधळ पुन्हा समोर आला आहे. स्थानिक सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी ऋचा भोपाळेला आधी नापास, तर तब्बल एक वर्षानंतर त्याच परीक्षेत उत्तीर्ण करण्यात आले. परीक्षा विभागातील चुकीच्या निकालामुळे विद्यार्थिनीचे एका वर्षाचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

ऋचा हिने शैक्षणिक सत्र २०१३-१४ ला सिपना महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिने प्रथम ग्रुप बी ची परीक्षा हिवाळी २०१३ मध्ये दिली असता सर्व चार विषयांत अनुत्तीर्ण करण्यात आले. त्यानंतर ऋचाने रसायनशास्त्र विषयाचे पुनर्मूल्यांकन व्हावे म्हणून विद्यापीठात अर्ज दाखल केला. पुनर्मूल्यांकनात तिला उत्तीर्ण करण्यात आले, त्यानंतर तिने ग्रुप बी मधील उर्वरित तीन तसेच ग्रुप ची उन्हाळी २०१४ मध्ये परीक्षा दिली. उन्हाळी २०१४ च्या परीक्षेत तिला सर्व सातही विषयांत अनुत्तीर्ण करण्यात आले. प्रथम वर्षात केवळ एकच विषयात उत्तीर्ण असल्याने तिला द्वितीय वर्षाला प्रवेश मिळू शकला नाही.

उर्वरित विषयासाठी तिने पुन्हा हिवाळी २०१४ ची परीक्षा दिली. मात्र, त्या वेळी तिला ग्रुप बी ची गुणपत्रिका देण्यात आली नाही. गुणपत्रिकेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर ती सर्व विषय उन्हाळी २०१४ च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची माहिती दिली. या प्रकारामुळे परीक्षा विभागातील कार्यप्रणालीचा अनुभव येत असून, प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आले. परीक्षा विभागात सुधारणा करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती या वेळी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके, परीक्षा नियंत्रक डॉ. जयंत वडते तर आंदोलनकर्त्यांमध्ये प्रा. स्वप्निल पोतदार, अखिलेश भारतीय, प्रतीक बिडकर, अभिलाष खारोडे, श्रीराम बालेकर, विकी पांडे, वेदांत भारद्वाज, गौरव कावरे, व्यंकटेश नरुटे, नैना गायकवाड, आदिती कुंटे, शामली मोहोड, नम्रता देशमुख, ऋचा भोपाळे, सुमित सतर्के, जयंत इंगळे, सेजल रायचुरा, रोशन विधने यांचा समावेश होता.

प्रश्नपत्रिकाच पोहोचल्या नाहीत
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील रामराव झनक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात सुमित सतर्के या विद्यार्थ्याची परीक्षा होती. सुमितने जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्या केंद्रावर जुन्या अभ्यासक्रमाचे पेपरच आले नसल्याची बाब समोर आली.

पेपर दिला तरी अनुपस्थित
ऋचाने उन्हाळी २०१४ च्या परीक्षेत रसायनशास्त्र विषयाची परीक्षा दिली. त्यात तिला २६ गुण दर्शवण्यात आले. मात्र, एका गुणपत्रिकेत परीक्षा दिली असताना तिला चक्क रसायनशास्त्र विषयास अनुपस्थित दर्शवण्यात आले आहे.

कार्यप्रणाली ढासळली
विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कार्यप्रणाली पूर्णपणे ढासळली आहे. गुणवाढ प्रकरणानंतरदेखील अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. पुनर्मूल्यांकन विभाग पैसे कमावण्याचे साधन बनत चालले आहे. असे असतानादेखील यामध्ये सुधारणा केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. - प्रा.स्वप्निल पोतदार, अभाविप