आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sant Gadge Baba University Answer Sheet Checking Issue

विद्यापीठ तपासणार आता उर्वरित उत्तरपत्रिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिसांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये काही संशयास्पद उत्तरपत्रिका आढळल्यास त्या पुन्हा विद्यापीठ यंत्रणेकडेच तपासणीसाठी द्याव्या लागणार आहेत. त्यातही ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या पूर्ण उत्तरपत्रिका पुन्हा आपणच तपासून द्याव्यात, असे पत्र शुक्रवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना दिले आहे.

पोलिसांनी दोन दिवसांत तपासलेल्या १६ हजार उत्तरपत्रिका वगळता उर्वरित सर्व उत्तरपत्रिका आता विद्यापीठाच्या यंत्रणेला तपासून त्या संदर्भात पोलिसांना अहवाल द्यावा लागणार आहे. विद्यापीठातील गुणवाढ प्रकरण पुढे आल्यानंतर पोलिसांनी अभियांत्रिकीच्या दोन लाखांवर उत्तरपत्रिका तपासणीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन ते काम सुरू केले. पहिल्याच दिवशी ५५ अधिकारी कर्मचार्‍यांची चमू या कामासाठी कार्यरत झाली. या चमूने एकाच दिवशी तब्बल १४ हजार उत्तरपत्रिका तपासून त्यामध्ये १३ संशयित उत्तरपत्रिका शोधल्या. यानंतर बंदोबस्तामुळे तपासणी मोहीम बंद होती. गुरुवारी पुन्हा १३ पोलिसांनी एका दिवसांत दोन हजार उत्तरपत्रिका तपासल्या.

पुढील काळात ग्रामपंचायत निवडणूक आहे. यासाठी पोलिस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त राहणार आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे शिवधनुष्य पेलणे पोलिसांसाठी कठीण झाले आहे. यातूनही संशयित उत्तरपत्रिकांची तपासणी पुन्हा करण्यासाठी विद्यापीठाच्याच यंत्रणेकडे द्याव्या लागणार आहेत. म्हणजे एकाच कामासाठी दोन यंत्रणा गुंतवणे योग्य नसल्याने पोलिसांनी स्वत: उत्तरपत्रिका तपासता हे काम विद्यापीठानेच करून द्यावे, असे पत्र शुक्रवारी परीक्षा नियंत्रकांना पाठवले आहे.

अजूनही 1 लाख ८५ हजार उत्तरपत्रिका
पोलिसांनी अभियांत्रिकीच्या १६ हजार उत्तरपत्रिका तपासल्या आहेत. मात्र, अजूनही 1 लाख ८५ हजारांच्यावर उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. या संपूर्ण उत्तरपत्रिका विद्यापीठ यंत्रणेला तपासणी करावे लागणार आहे. यासाठी पोलिसांनी विद्यापीठाला अवधी किती हे सांगितले नाही; तरीही लवकरात लवकरच तपासणी करून अहवाल द्यावा लागणार आहे.

विद्यापीठच करेल तपासणी
अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमुळे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करावा लागतो. त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे. यातच एका दिवशी ५० पोलिस अधिकारी, कर्मचारी या कामासाठी व्यस्त होतात. तसेच आम्ही उत्तरपत्रिकांची तपासणी केल्यानंतर यामधील संशयित उत्तरपत्रिकांची पुन्हा विद्यापीठाच्याच यंत्रणेकडून तपासणी करून घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे उर्वरित संपूर्ण उत्तरपत्रिका तपासणी करून द्याव्यात, असे पत्र परीक्षा नियंत्रकांना दिले आहे. देवराजखंडेराव, ठाणेदार, फ्रेजरपुरा.