आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sant Gadgebaba University Answersheet Checking News In Divya Marathi

चौकशी समिती तपासणार उत्तरपत्रिका, ३२ (६) समितीची अाज महत्त्वाची बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गोपनीय विभागात पोलिसांनी शोधून काढलेल्या खोडतोड असलेल्या १३ उत्तर पत्रिकांची तपासणी ३२ (६) या चौकशी समितीकडून केली जाणार आहे.

त्यामुळे डॉ. संतोष ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील ३२ (६) चौकशी समितीने तातडीने गुरुवारी (१६ एप्रिल) बैठक बोलावली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विभागाच्या परीक्षा विभागात अभियांत्रिकी विभागातील गुणवाढ प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. फेब्रुवारी महिन्यात परीक्षा विभागाकडून उघड करण्यात आलेल्या प्रकरणात अभियांत्रिकी शाखेतील नऊ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाशी संबंध आढळून आल्याने सात रोजंदारी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना अभियांत्रिकी शाखेतील २१ उत्तर पत्रिकांमध्ये खोडतोड करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुणवाढ प्रकरण समोर आले होते. त्यामुळे हिवाळी २०१४ परीक्षेत आणखी उत्तरपत्रिकांमध्ये खोडतोड असण्याची शंका पोलिसांना आली. सोमवारी (िद. १३) विद्यापीठातील गोपनीय विभागात पोलिसांच्या मोठ्या ताफ्याकडून अभियांत्रिकी शाखेतील उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली. पोलीसांकडून करण्यात आलेल्या १४ हजार उत्तरपत्रिकांच्या तपासणीत १३ मध्ये खोडतोड असल्याचे नव्याने आढळून आले.