नागपूर - ‘केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या, नागपूर सर्कलतर्फे यवतमाळ जिल्ह्यातील कायर येथे सध्या सुरू असलेल्या उत्खननात सातवाहनकालीन संस्कृतीच्या खुणा सापडल्या असून, या बहुसांस्कृतिक साइटवर त्याही पूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा सापडू शकतात’, अशी माहिती नागपूर सर्कलच्या उत्खनन शाखेच्या अधीक्षका नंदिनी भट्टाचार्य-साहू यांनी दिली.
कायर हे वणी तालुक्यातील गाव वणीपासून २० किमीवर विदर्भ नदीच्या तीरावर वसले आहे. नागपूर जिल्ह्यातील अडम नंतर विदर्भातील हे दुसरे मोठे उत्खनन आहे. कायर येथे प्राचीन वारसा सापडण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी प्रारंभी केलेल्या उत्खननातच येथे बहुकालिक संस्कृतीच्या खुणा सापडेल, हे स्पष्ट झाले. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने गावातच शिबिर लावून २४ जानेवारी २०१५ पासून उत्खनन सुरू केले. मेच्या मध्यापर्यंत उत्खनन सुरू राहणार असल्याचे नंदिनी साहू यांनी सांगितले.
या साइटवर आतापर्यंत झालेल्या उत्खननात सातवाहनकालीन संकुलाचे अवशेष, टेराकोटाच्या मातीच्या फरशा चमचे, सोन्याची बांगडी, चांदी, सोने जस्ताचे शिक्के, सातवाहनकालीन मुद्रांचे ठप्पे मारलेले सिलिंग, मणी आदी वस्तू मिळाल्या. कायरची बहुसांस्कृतिक साइट खूप काही देणारी आहे. विदर्भातील ताम्रपाषाणकालीन संस्कृतीवर यामुळे बराच प्रकाश पडेल.
पट्टेदार वाघिणीचा वावर
पुरातत्त्विवभागाचे उत्खनन सुरू असलेल्या कायर परिसरात एका पट्टेदार वाघिणीचा वावर आहे. वन विभागाने याची सूचना आम्हाला दिली आहे. त्यामुळे वन विभागाशी समन्वय ठेवून आमचे काम सुरू आहे. गावातच तंबू टाकून मुक्काम आहे. राजेश मेहर, प्रशांत सोनोने, विजय गेडाम, स्नेहमाला सुपे, हेमराज बारापात्रे, राजेंद्र नागुलवार आदींसह पुरातत्त्व विभागाची चमू काम करत आहे.
आज हेरीटेज डे
मजुरांना आले अच्छे दिन : पुरातत्त्विवभागाच्या उत्खननामुळे कायर परिसरातील मजुरांना अच्छे दिन आले आहे. कायरमध्ये महिलांना १२०, तर पुरुषांना १५० रुपये मजुरी मिळते. मात्र, पुरातत्त्व विभागातर्फे सर्वांना २४८ रुपये मजुरी देण्यात येत आहे. साइटवर १७५ मजूर असून, त्यात महिलांची संख्या अधिक असल्याचे साहू म्हणाल्या.
कायरमध्ये अशी मिळते मजुरी
महिला - १५० रु.
पुरुष - १२० रु.
२४८ रुपये पुरातत्त्व विभागातर्फे सर्वांना मजुरी