आमिर खानच्या सत्यमेव जयते भाग-१ मध्ये महागड्या उपचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. महागड्या ब्रँडेड औषधाला स्वस्तातील जेनेरिक पर्यायावरही चर्चा झाली होती. याचे पडसाद कसे उमटले ते जाणून घ्या...
नागपूरचे वकील अनिल किलोर जनमंच नावावी स्वयंसेवी संस्था चालवतात. सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमातून त्यांना जेनेरिक औषधाचे दुकान सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी यादवनगरात दोन महिन्यांच्या आत जन मंच जेनेरिक्स नावाने दुकान सुरू केले. लोकांना जेनेरिक्स म्हणण्यात अडचणी येऊ लागल्यामुळे त्यांनी यास आमिर खानचे दुकान संबोधण्यास सुरुवात केली. वर्षभरात धरमपेठ भागात आणखी एक दुकान सुरू करण्यात आले. आता अमरावतीमध्ये दुकान उघडण्याची तयारी सुरू आहे. मुंबईतील पर्यावरणवादी दांपत्य अफजल आणि नुसरत खत्री यांनाही जेनेरिक औषधाचे महत्त्व कळले. त्यांनी स्वत: औषध घेण्यास सुरुवात केली.
महागडे औषध का? : जेनेरिक व ब्रँडेडमध्ये काहीच फरक नसल्याचे शोमध्ये सांगण्यात आले होते. डाॅक्टर स्वत:च्या व कंपनीच्या फायद्यासाठी महागड्या सूत्राची औषधे लिहून देत असल्याची माहिती देण्यात आली.
८ हजारांचे औषध आता केवळ एक हजारात
नागपूरचे रहिवासी मनीष अग्रवाल यांची आई रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्ण आहेत. त्यांचे दर महिन्यास आठ हजार रुपये औषधावर खर्च होत होते. त्यांना कोणीतरी जनमंच जेनेरिक्सची माहिती दिली. आता त्यांना तिच औषधे एक हजार रुपयांत मिळत आहेत. निवृत्त भूलतज्ज्ञ डॉ. हेमंत साने म्हणाले, लोकांना प्रत्येक औषधातून नफा कमावण्याची इच्छा असते. मात्र, इथे एमआरपीपेक्षाही कमी किंमतीत औषधे मिळतात.
संसदीय समितीचे आमिरला निमंत्रण |या कार्यक्रमानंतर वाणिज्य प्रकरणांच्या संसदेच्या स्थायी समितीने आमिरला जेनेरिक औषधावर चर्चा करण्यासाठी बोलावले होते. आमिरने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरकारी रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध करण्याची मागणी केली होती.