आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar And Nitin Gadkari Share One Stage In Nagpur

शरद पवार- नितीन गडकरी नागपूरमध्ये येणार एका मंचावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पूर्ती समूहातील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांच्या निमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील राजकीय मांडवलीची चर्चा बरीच रंगली. आता विदर्भातील शेतकर्‍यांच्या प्रश्नावर 12 ऑक्टोबरला पवार आणि गडकरी थेट एका मंचावर येणार असून उभय नेते विदर्भातील शेतकरी प्रतिनिधींशी उपाययोजनांवर सल्लामसलत करणार आहेत.

गडकरी यांच्या पूर्ती समूहावर आर्थिक अनियमिततांचे आरोप झाले. या आरोपांच्या धुराळ्यात गडकरी यांच्या पक्षबाह्य राजकीय हितसंबंधांचीही बरीच चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने त्यांची शरद पवार यांच्याशी असलेली जवळीक टीकेचाही विषय ठरली होती. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी आपले राजकीय हितसंबंध नाकारले नव्हते. गडकरी यांच्या पुढाकाराने नागपुरात आयोजित झालेल्या अँग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीला पवार यांनी आवर्जून भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.

दरम्यान, 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी स्थानिक वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गडकरी यांच्या पूर्ती समूहाच्या वतीनेच हे आयोजन होणार आहे. त्यात पवार आणि गडकरी हे नेते एकत्रितपणे विदर्भातील शेतकरी प्रतिनिधींशी उपाययोजनांवर चर्चा करणार आहेत. विदर्भातील 400 ते 500 शेतकरी प्रतिनिधींना या उपक्रमात सहभागी करून घेण्याची तयारी सुरू आहे.

या निमित्ताने पूर्ती समूहाकडून शेतकर्‍यांसाठी राबवल्या जाणार्‍या योजनांचे सादरीकरण केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे 12 ऑक्टोबरला नागपुरात आगमन होणार आहे. पवारांच्या दोन दिवसांच्या विदर्भ दौर्‍यातील हा पहिलाच कार्यक्रम आहे. पवार-गडकरी एका मंचावर येणार असल्याने राजकीय वर्तुळाचे कुतूहल व्यक्त होत आहे.