आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेध विधानसभेचे: शिवसेनेच्या 18 जागांवर भाजप नेत्यांचा डोळा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- लोकसभा निवडणुकीत यशाने हुरळून गेलेल्या शिवसेना- भाजपमध्ये आता विधानसभेच्या जागावाटपावरून शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून मुंबईत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होत आहे. त्यात शिवसेनेच्या कोट्यातील किमान 18 जागांवर भाजप दावा करणार आहे. या जागा कोणत्याही परिस्थितीत पदरात पाडून घेण्यासाठी आमचा आग्रह राहणार असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

2009 च्या निवडणुकीत शिवसेना 160, भाजप 119 आणि मित्रपक्ष तसेच समर्थक 9 असे युतीत 288 जागांचे वाटप झाले होते. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशामुळे भाजप नेत्यांनी सुरुवातीला निम्म्या जागांवर दावा केला होता.
भाजपने 144 जागांची मागणी केली असली तरी शिवसेनेने मात्र जुन्या फॉर्म्युल्यानुसारच जागावाटप होईल, असे ठामपणे सांगितले आहे. मात्र, काही जागांवर अदलाबदली करणे शक्य असल्याचे सूतोवाचही त्यांनी या वेळी केले होते.

भाजपने अलीकडेच राज्यस्तरीय आढावा घेऊन शिवसेनेच्या कोट्यातील किमान 18 मतदारसंघांची मागणी करण्याचे निश्चित केले आहे. या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे उमेदवार कायम पराभूत झाले आहेत. शिवाय, तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता समीकरण भाजपच्या बाजूने आहे. त्यामुळे महायुतीला विजय मिळवायचा असेल तर भाजपनेच या

जागा लढवाव्यात, अशी या मतदारसंघांमधील परिस्थिती असल्याचा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्याने केला.

विजयाचा निकष महत्त्वाचा मानणार
भाजप नेत्यांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यश-अपयश, विजयाची खात्री या निकषांवर जागावाटप होणे आवश्यक आहे. सध्या युतीच्या घटकपक्षांनी जिंकलेले मतदारसंघ व फार कमी मतांनी पराभूत झालेल्या जागांबाबत वाद होण्याची शक्यता नाही. दहा हजारांपेक्षा कमी मतांनी पराभूत झालेल्या शिवसेनेकडील 14 तसेच भाजपकडील 11 मतदारसंघांमध्ये बदल होण्याची कोणतीही शक्यता नाही.

या मतदारसंघांवर दावा
उरण, वरळी (मुंबई), गोंदिया, दक्षिण नागपूर, वर्धा, अचलपूर, पूर्व अकोला, लोहा (नांदेड), औसा (लातूर), श्रीरामपूर (नगर), राधानगरी (कोल्हापूर), मुखेड (नांदेड), वणी (यवतमाळ), आरमोरी (गडचिरोली) यांसह आणखी चार असे शिवसेनेकडील 18 मतदारसंघ भाजप मिळवण्यासाठी आग्रही आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघही आपल्याकडे ठेवण्याची भूमिका भाजपकडून मांडली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

इकडे शिवसेनाही लागली तयारीला
नाशिक- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगरमधील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. तसेच नाशिक विभागातील भाजपकडे असलेल्या 15 मतदारसंघातही पक्षाच्या ताकदीची चाचपणी केली. यावरून शिवसेनाही स्वबळाचा पर्याय आजमावून पाहात असल्याचे स्पष्ट झाले. भाजपने ताठर भूमिका घेऊन ‘वेगळा’ निर्णय घेतल्यास आपणही तयारीत असावे, अशी रणनिती शिवसेनेने पूर्वीच आखली आहे.