नागपूर - मागच्या वेळी मंत्रिपदाची शपथ हुकलेल्या शिवसेनेचे राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांना हिवाळी अधिवेशनानंतर केंद्रीय राज्यमंत्रिपद दिले जाणार आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनीही देसाईंच्या मंत्रिपदाला हिरवा कंदीला दाखवला आहे. मागच्या वेळी शपथविधीसाठी दिल्लीत गेलेले देसाई भाजपशी झालेल्या कुरबुरीनंतर एेनवेळी माघारी आले होते.
आधी महाराष्ट्रातील युतीचा निर्णय घ्या, त्याशिवाय देसाई केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत, अशी भूमिका केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी उद्धव ठाकरेंनी घेतली होती. मात्र आता भाजपने राज्यातही शिवसेनेला सत्तेचा वाटा दिल्याने दोन्ही पक्षातील वितुष्ट निवळले असून देसाई यांच्या ‘लाल दिव्या’चा मार्गही मोकळा झाला आहे.
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात अनंत गिते हे शिवसेनेचे एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. आता विस्तारात देसाईंचा समावेश केल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची संख्या दोनवर जाईल. मात्र भाजपनंतर देशात सर्वाधिक १८ खासदार असतानाही शिवसेनेच्या वाट्याला मात्र एकच मंत्रिपद आल्यामुळे आधीच या पक्षात नाराजी आहे. विस्तारात देसाई यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असली तरी ही नाराजी पूर्णपणे दूर होणार नसल्याचे सांगितले जाते.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच फेरबदलही होणार आहे. भाजपच्या मुख्तार अब्बास नक्की यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. नक्की यांच्याकडे अल्पसंख्याक विभागाचे मंत्रिपद देण्यात येणार आहे. सध्या हे पद नजमा हेपतुल्ला यांच्याकडे असून त्यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात येईल.
शिवसेना झुकली
राज्यात गृह, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा अशा खात्यांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेने तसे होत नसल्याने देसाईंना दिल्ली विमानतळावरून परत बोलावले होते. मात्र, तरीही भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या मागण्यांना महत्त्व न देता राज्यात कमी महत्त्वाचीच खाती देऊन बाेळवण केली. यावरूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शेवटी नमते घ्यावे लागले, अशी चर्चा आहे.