आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena MP Anandrao Adsul Booked For Abusing Actress

खासदार अडसुळांवर विनयभंगाचा गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून याच मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह 14 जणांवर रविवारी विनयभंग, अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात दुपारी चार तास तणावाचे वातावरण होते. दरम्यान, राणा यांचे आरोप खोटे असल्याचा दावा अडसूळ यांनी पत्रकार परिषदेत केला.

रविवारी शहरात एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या कार्यक्रमात नवनीत राणा, अडसूळ समर्थकांसह सहभागी झाले होते. विकासकामांच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच अडसूळ व त्यांच्या समर्थकांनी राणा यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. ‘अडसूळ यांनी आपल्यावर चारित्र्यहीन असल्याचे आरोप करत शिवीगाळ केली. तसेच जातीचा उल्लेख करून, ‘तू बसच्या खाली उतर’ म्हणत दमबाजी केली,’ असे राणा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याच दरम्यान अडसूळ यांच्या समर्थकांनी नवनीत राणा यांच्या दिशेने धाव घेतली, मात्र निवेदकांच्या मध्यस्थीमुळे वाद थांबला.

दरम्यान, कार्यक्रमानंतर नवनीत राणा यांनी तातडीने समर्थकांसह गाडगेनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी खासदार अडसूळ, प्रकाश मंजलवार आणि नितीन तारेकर यांच्यासह 12 ते 14 जणांविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी आणि अ‍ॅट्रासिटी कायद्यनुसार गुन्हा दाखल केला आहे. या वेळी राणा समर्थकांनी पोलिस ठाणे परिसरात अडसूळ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

हे तर अजित पवार यांचे षड्यंत्र : अडसूळ
राणा यांनी केलेले आरोप धादांत खोटे व तथ्यहीन असल्याचे खासदार अडसूळ यांनी सांगितले. अशाप्रकारेच कोणतेही व्यक्तव्य माझ्याकडून झाले असल्यास त्या वृत्तवाहिनीच्या चित्रीकरणातून तपासून शहानिशा करून घ्यावी. माझे निर्दोषत्व या चित्रीकरणातून सिद्ध होणारच आहे. संपूर्ण घटनाक्रमामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे षड्यंत्र असल्याचाही आरोप अडसूळ यांनी केला आहे. शिवसेना नेहमीच महिलांचा सन्मान करते आणि यापुढेही करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.