आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या गडात शिवसेनेचे ‘मिशन विदर्भ’, नागपूरची जबाबदारी संजय राऊतांकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - केंद्र व राज्यात सत्तेत भागीदारी करतानाच शिवसेनेने राज्यात आक्रमकपणे पक्षविस्ताराची स्वतंत्र मोहीम हाती घेतली असून त्याची सुरुवात भाजपचा गड असलेल्या विदर्भापासून करण्यात आली आहे. शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची फौज विदर्भात उतरली असून विविध जिल्ह्यांमध्ये बैठका, कार्यकर्त्यांशी संपर्क, जुन्या कार्यकर्त्यांची ‘घरवापसी’ या माध्यमातून पक्षसंघटना मजबूत करण्याचे व त्या माध्यमातून भाजपला थेट आव्हान देण्याचे प्रयत्न शिवसेनेने चालवलेले दिसत आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला विदर्भात मोठा धक्का बसला होता. त्याच वेळी भाजपने गडावरील वर्चस्व कायम ठेवले. आता केंद्र व राज्यातील सत्तेत भागीदारीत असूनही या दोन मित्रपक्षांचे संबंध कमालीचे ताणलेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षविस्ताराच्या कामाला लागली असून भाजपचा गड असलेला विदर्भ हा शिवसेनेचे प्रमुख लक्ष्य आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मिशन विदर्भ’चा भाग म्हणून शिवसेनेचे मंत्री, पदाधिकाऱ्यांची फौज सध्या या भागात उतरली आहे. त्यातही भाजपला भरभरून यश देणाऱ्या पूर्व विदर्भाच्या पट्ट्यावर शिवसेनेकडून अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.

काही कारणास्तव पक्ष सोडून गेलेल्या जुन्या शिवसैनिकांना पक्षात आणण्याचे प्रयत्न होत आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न नेत्यांकडून होत आहे. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांपूर्वी अनेक जिल्ह्यांत खिळखिळी झालेली पक्षसंघटना मजबूत करण्याचे प्रयत्न आहेत. यासंदर्भात माहिती देताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मिशन विदर्भसाठी मैदानात उतरल्याचे मान्य केले.

‘नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विदर्भात पक्षाला मिळालेले अपयश अनपेक्षित होते. त्याचा आढावा घेतला जात आहे. पूर्वी युती असल्याने अनेक ठिकाणी पक्षसंघटना मजबूत नव्हती. आता ती अडचण नसल्याने प्रत्येक जिल्ह्यात संघटना वाढवण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना विदर्भात पाठवले आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. संघटना वाढीसाठी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा उपयोग होतो,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघाचा समावेश असलेल्या नागपूर जिल्ह्याची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्याकडे, तर अमरावतीची जबाबदारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे आहे. सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, दादाराव भुसे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह इतर अनेक मंत्र्यांना विदर्भातील जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून या मंत्र्यांचे दौरे सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्यात पक्षसंघटनेचा आढावा घेतला जात आहे.