आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गिते म्हणाले, भाजपने सोबत घेऊन मोठेपणाच दाखवला, गडकरी-मोदींचे कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘केंद्रात भाजपला पूर्ण बहुमत असताना त्यांनी आम्हाला सोबत घेऊन मनाचा मोठेपणा दाखविला. आता जनकल्याण पर्वावर आमच्यात मिठाचा खडा टाकू नका,’ असा टोला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना लगावला.

केंद्र सरकारची वर्षभरातील कामगिरी मांडण्यासाठी आयोजित युतीच्या जनकल्याण पर्व मेळाव्यासाठी गिते नागपुरात आले होते. शिवसेना- भाजप युतीमधील बेबनावावरील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांना बरीच कसरत करावी लागली. मात्र यासंदर्भातील भाष्य टाळून गिते यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे कौतुकही केले. गिते म्हणाले, ‘शिवसेना केंद्र व राज्यातही सत्तेत आहे. त्यामुळे नाराजी असण्याचा प्रश्नच नाही. उद्धव ठाकरे यांनी सरकारवर वेळोवेळी टीका केल्याचा आरोप गिते यांनी फेटाळून लावला. ‘काही मुद्द्यांवर दोन पक्षांमध्ये मतभिन्नता आहे. ती व्यक्त करणे म्हणजे टीका होत नाही. जैतापूर अणुप्रकल्पाला असलेला शिवसेनेचा विरोध केवळ सुरक्षेच्या कारणास्तव आहे. फुकुशिमा अपघाताचे उदाहरण ताजे आहे. जैतापूर भूकंपप्रवण क्षेत्र अाहे. दहशतवादी हल्ल्याचाही धोका आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेच आमचा प्रकल्पाला विरोध अाहे,’ असे गिते यांनी स्पष्ट केले.

मोदी-गडकरींचे कौतूक
देशाला विकासाची अपेक्षित गती गाठायची असेल तर पंतप्रधान मोदींच्याच वेगाने वाटचाल करावी लागेल. तरच देश विकसित देशांच्या रांगेत येईल, या शब्दात मोदींचे कौतूक करताना गिते यांनी मेळाव्यात केंद्राच्या योजनांचा आढावा मांडला. नितीन गडकरी यांच्यासारखे धाडसी निर्णय अन्य कुठल्याही मंत्र्याने घेतले नाहीत, असे नमूद करीत नागपुरातील एम्स, आयआयआयटी, मेट्रो रेल्वे सारख्या प्रकल्पांचे श्रेय त्यांनाच असल्याचे गिते यांनी नमूद केले. युतीच्या संयुक्त मेळाव्यात भाजप-शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच झालेल्या संयुक्त मेळाव्यात दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींनी एकमेकांवर भरपूर स्तुतीसुमने उधळली. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, भाजपचे राज्यसभेचे खासदार अजय संचेती यांच्यासह अनेक आमदार मेळाव्याला उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...