नागपूर - पैशाच्या वादातून दोन वर्षांपूर्वी नागपुरात दिवसाढवळ्या बिअर बारमध्ये झालेल्या प्रॉपर्टी डीलरच्या खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने सीसीटीव्हीचे फुटेजच्या आधारावर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
तुषार साहेबराव दलाल (३१), कुणाल मोतीराम मस्के (३०), लक्ष्मीकांत ऊर्फ लच्छू रवींद्र फाये (३२), अमोला महादेवराव मंडाळे (३०), भूपेश ऊर्फ रिंकू विठ्ठलराव टिचकुले (२९) आणि समीर सुरेशराव काटकर (२९) अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. जितेंद्र मारोतराव गावंडे (३७) असे मृताचे नाव असून डिसेंबर २०१२ मध्ये त्याने तुषारला ५० हजार उधार दिले होते. त्यानंतर पत्नीच्या प्रसूतीसाठी जितेंद्र हा तुषारला पैसे परत मागत होता. दरम्यान १० जानेवारी २०१३ रोजी जितेंद्रने तुषारला पैशासाठी फोन केला असता त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सायंकाळी ५.३० वाजता नागपुरातील भांडे प्लॉट परिसरातील सेवन हिल्स बिअर बार अँड रेस्टॉरंटमध्ये बोलावले.
तुषार हा इतर पाच मित्रांसह साडेपाचपूर्वीच बारमध्ये पोहाेचला. त्यापैकी चार जण बारच्या आतमध्ये शिरले तर दोघेजण बाहेर उभे होते. तुषार हा मित्र असल्यामुळे जितेंद्रने धमकीला गंभीरतेने न घेता साडेपाच वाजता बारमध्ये पोहोचला. तुषार हा बार काऊंटरवरच जितेंद्रची वाट बघत बसला होता. बार काऊंटरवरच तुषार आणि जितेंद्रची बाचाबाची झाली. अचानक तुषारने सहकारी भूपेश याच्याकडून चाकू मागितला आणि जितेंद्रवर वार करायला सुरुवात केली. तर लच्छू यानेही कंबरेतून चाकू काढून भोसकले. बार मॅनेजर रघुवीर रमेश वल्लभदास याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही चाकूचा धाक दाखवला. यानंतर सर्व आरोपी पळून गेले. हा सर्व घटनाक्रम बारमधील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्यासमक्ष झाली. त्या आधारावर न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली.