आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्याय हक्कांसाठी वंचितांचा आवाज बुलंद; सहाव्या वेतन आयोगासाठी फार्मसिस्टनी दिले धरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - केंद्र शासनाप्रमाणे सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासोबतच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाभरातील फार्मसी आॅफिसर्सनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास 25 जूनपासून सामूहिक रजा घेऊन ‘कामबंद’, तर त्यानंतर 30 जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 171 फार्मासिस्ट या आंदोलनात सहभाग झाले. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयापासून ते सुपरस्पेशालिटी, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधी वितरण यंत्रणा ठप्प पडली होती. सहावा वेतन आयोग लागू करताना राज्य शासनाने भेदभाव केला असून, केंद्राप्रमाणे शिफारशी लागू केल्या नाहीत. परिणामी, आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्याचे औषधी निर्मात्यांचे म्हणणे आहे. या पदावर काम करणार्‍यांना आयुष्यभर पदोन्नती मिळत नाही. त्यांना पदोन्नती देण्यात यावी, 30 खाटांच्या रुग्णालयातील रद्द करण्यात आलेले फार्मासिस्टची पदे पुनर्जीवित करावेत आदी मागण्याही या आंदोलनातून केल्या. अध्यक्ष प्रकाश कोकर्डेकर, शरद बेथारिया, अनिल राऊत, अब्दुल रहमान, अशोक किनवटकर, सुरेश लाहोरे, विजय कापडे, जानकीराम वसतकर, अशोक दाते, अनिल गुल्हाने, रेखा डबरासे, वैशाली बिंदोड, सुजाता थोरात, प्रियंका मंदावरे, स्नेहल शिरभाते आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
परिसंघाचा जाहीर पाठिंबा
फार्मासिस्टच्या या आंदोलनाला अनुसूचित जाती, जमाती संघटनांच्या अखिल भारतीय परिसंघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. परिसंघाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोजने यांनी आंदोलनस्थळी पोहोचून हा पाठिंबा घोषित केला.
गारपीटग्रस्तांची निवड करताना झाला घोळ
प्रतिनिधी । अमरावती -
शासकीय मदतीसाठी गारपीटग्रस्तांची निवड करताना झालेला घोळ जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात पोहोचला असून, पात्र शेतकर्‍यांना पुरवणी यादीत समाविष्ट करण्याची मागणी प्रहार संघटनेने केली आहे.

संघटनेचे विदर्भप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी अपर जिल्हाधिकारी किशोर कामुने यांची भेट घेतली. या वेळी निवडीतील घोळ शिष्टमंडळाने कामुने यांच्या निदर्शनास आणून दिला. जिल्हाभर असा घोळ झाला असून, संबंधित तहसीलदारांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व तक्रारींचा एकत्रित विचार करून निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले. दरम्यान, ज्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अजूनही मदत देण्यात आली नाहीत, त्यांची नावे पुरवणी यादीत समाविष्ट करण्याची मागणी या वेळी करण्यात आली; तसेच सदोष यादी तयार करणार्‍या समितीतील अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई केली जावी, असा आग्रहही या वेळी धरण्यात आला.

उदाहरणादाखल तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील शेतकर्‍यांची यादी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आली आहे. यामध्ये गोपाल अंबुलकर, गुलाबराव हगवणे, रामराव मानकर, पुष्पा भालेराव, कांताबाई गभणे, विनोद बालपांडे, कमला मानापुरे, किसनराव ढोबळे, हरिभाऊ सोनटक्के, नीलेश बालपांडे, दिलीप डोंगरे, पंजाब मेश्राम, सुमित्रा बेले, कुसुम बालपांडे, किसनराव मेहरे, संजय अंबुलकर, रेखा झाडे आदींचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचा नियमित वेतनासाठी ठिय्या

प्रतिनिधी । अमरावती -
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन नियमित मिळण्यात यावे, शिक्षकांचे रखडलेले वेतन त्वरित देण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 23) जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन अद्यापही देण्यात आलेले नाही. त्यामुळे रखडलेले वेतन त्वरित मिळून पुढील महिन्याचे वेतन पाच तारखेच्या आधी मिळावे, पगार विलंबाने होत असल्याने शिक्षकांना पडणार्‍या कर्जावरील व्याजाचा भुर्दंड पगार करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर निश्चित करून त्यांच्याकडून व्याजाच्या रकमेची वसुली करण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनेचे निकष व समुपदेशनाची पद्धत संघटनेला माहीत करावी, समायोजनानंतर शिक्षक प्रशिक्षण देण्यात यावे, नियमानुसार शिक्षक संघटनांची समस्या निवारण सभा नियमित घेण्यात यावी, जीपीएफ हिशेबाची मार्च 2014 पर्यंतची स्लिप त्वरित देण्यात यावी, 2003-04 मध्ये मेळघाटातील सर्वसाधारण यादीतून निवड झालेल्या शिक्षकांना बदलीस पात्र ठरवण्यात यावे, आरटीई नियमानुसार, निर्माण झालेल्या पदांवर पदवीधर शिक्षकांना श्रेणीवाढ देण्यात यावी, विस्तार अधिकारी वर्ग 2 व 3 तसेच केंद्रप्रमुख यांची पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावी, प्रशासकीय बदल्या झालेल्या शिक्षकांचे प्रवास देयके त्वरित मंजूर करण्यात यावे आदी मागण्या शिक्षकांच्या वतीने करण्यात आल्या.

या मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी यांना देण्यात आले. या वेळी संघटनेचे चंद्रकांत पुसदकर, गोकुलदास राऊत, अशोक पारडे, विजय पुसलेकर, राजेश सावरकर, सुनील केने, अनिल कोल्हे, विलास देशमुख, सुरेश चिमणकर, नरेश शुक्ला, मो. नाजीम अ. रज्जाक, अ. राजिक हुसैन, जावेद इकाल जौहर, मो. गयास मो. हनीफ आदी संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र - औषधी निर्माता, प्राथमिक शिक्षक, गारपीटग्रस्त शेतकरी यांनी आपआपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी जिल्हा प्रशासन दणाणून सोडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फार्मसिस्टनी केंद्र शासनाप्रमाणे सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासोबतच विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे दिले. शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडून नियमित वेतन अदा करण्याच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. गारपीटग्रस्तांच्या निवड यादीत घोळ झाल्याचा मुद्दा प्रहार संघटनेने जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात मांडून न्यायाची मागणी केली.