आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोंदिया जिल्ह्यातील आश्रमशाळेत 3 विद्यार्थिनींना सर्पदंश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- झोपेत असलेल्या तीन विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील मेंढा (ता. तरोडा) येथील निवासी आश्रमशाळेत गुरुवारी पहाटे घडली. त्यांना गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एकीची प्रकृती गंभीर आहे.

वैष्णवी मरसकोल्हे (वय 9), आरती धुर्वे (वय 6) आणि अनिता कुंभारे (वय 9) अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत. यापैकी वैष्णवी आणि अनिता या दोघी चौथीच्या, तर आरती पहिलीच्या वर्गात शिकते. मेंढा येथील रवींद्रनाथ टागोर आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरतात. ग्रामीण भागातील तीनशेच्यावर विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळा व्यवस्थापनाने पलंगाची सोय न केल्याने या विद्यार्थिनी जमिनीवरच अंथरुण टाकून झोपल्या होत्या. रात्रभर वीजही नव्हती. पहाटे साडेपाचच्या सुमारास तीन विद्यार्थिनींना विषारी सापाने चावा घेतला. वेदनांमुळे त्यांनी आरडाओरड केली. शिक्षकांनी तेथे येऊन पाहणी केल्यावर तेथे साप आढळून आला. शिक्षकांनी सापाला ठार मारले व अत्यवस्थ विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल केले.

देवरीची पुनरावृत्ती
यापूर्वी 12 जुलै 2012 रोजी देवरी तालुक्यातील मकरधोकडा येथेही आश्रमशाळेतील पाच विद्यार्थ्यांना सर्पदंश होऊन त्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली होती.