आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Worker Dr. Abhay Bang Interview In Divya Marathi

विशेष मुलाखत : बंदी घातली तरच राज्यात दारूमुक्ती शक्य, डॉ. अभय बंग यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘पश्चिमेकडील देशांमध्ये दारूच्या खपाचे प्रमाण नियोजनबद्ध कमी केले जात आहे. भारतात साठ टक्के पुरुष व नव्वद टक्के महिला अजूनही या व्यसनापासून दूर आहेत. स्टेटस सिम्बॉल म्हणून दारू पिणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे. चंद्रपुरात दारूबंदीनंतर काही मंडळी व्यक्तिस्वातंत्र्यांची भाषा करू लागली. मात्र एकदा दारूची चटक लागल्यावर तीच तुमच्यावर नियंत्रण ठेवते,’ अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रश्न : तुम्ही महाराष्ट्रात दारूबंदीची मागणी केली. ती कितपत व्यवहार्य आहे?
डॉ. बंग : बंदीची वाटचाल दारूमुक्तीच्या दिशेने राहिली तर ती निश्चितच व्यावहारिक ठरते. दारूबंदी ही मुक्तीसाठीची पूर्वअट आहे. दारूमुक्ती हे ध्येय असले पाहिजे. ते क्रमाक्रमाने गाठणे शक्य आहे. सरकार बेफामपणे दारू विकत असेल तर तुम्ही कोणाकोणाला समजावणार? दारूचा नळ धो-धो वाहत असेल तर फरशी तरी कोठवर पुसणार? त्यातून फार तर रोहयोचा नवा कार्यक्रम तयार होईल. दारूची मुबलक उपलब्धता हीच खरी समस्या आहे. शासनाने बंदी करून ती कमी केली पाहिजे. गुजरातने ते केले. केरळनेही ठरवले आहे.

*प्रश्न : वर्धा, गडचिरोलीत दारूबंदी कितपत यशस्वी ठरली?
डॉ. बंग : या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक आहे. अपयश आले हा गैरसमज आहे. बंदीनंतर या जिल्ह्यांमध्ये साठ टक्के दारू कमी झाल्याचे आकडे सांगतात. चाळीस टक्के कायम असल्याचे गृहीत धरले तरी साठ टक्क्यांकडे का दुर्लक्ष करतो? वर्धेतही बंदी नसती तर किती दारू खपली असती याचा विचार करणार की नाही? या जिल्ह्यात गांधी आणि विनोबांचा आदर म्हणूनच दारूबंदी झाली. त्यात लोकांच्या सहभागाचे प्रयत्नच झाले नाहीत. निव्वळ दुकाने बंद केली. त्याच वेळी पिण्याचे परवाने वाटून एकाच वेळी बारा- बारा बाटल्यांची मुभा दिली गेली. हजारो चिल्लर दुकाने या पद्धतीने सुरू झाली.

*प्रश्न : वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीही दारूबंदीच्या विरोधात दिसतात?
डॉ. बंग : दारूवर जगभर झालेल्या अभ्यासात ती मानवी आरोग्यासाठी घातकच असल्याचा अंतिम निष्कर्ष काढला गेलाय. ती प्यायल्याने आजार, कामावरील गैरहजेरी, अपघात वाढतात. कामाच्या जागी चुका होतात. कामातील उत्पादकता प्रचंड कमी होते. मी नाही, जागतिक आरोग्य संघटना हे ओरडून सांगत आहे. जगभरात ३३ लाख लोकांच्या मृत्यूचे एकमेव कारण दारू असते. अर्थव्यवस्थेचा मुख्य पाया असलेल्या १५ ते ५० वयोगटातील पुरुषांच्या मृत्यूचे पहिले कारण दारू असल्याचे जागतिक आरोग्य संघटना नमूद करते. बंगळुरू येथील िनमहॅन संस्थेच्या अभ्यासानुसार, सरकारला दारूतून २१३ अब्ज रुपयांचे उत्पन्न मिळत असले तरी दारूपायी होणारे नुकसान २४० अब्जांचे आहे. हा जुनाच अहवाल आहे. आकडे कितीतरी वाढलेले आहेत. त्यामुळे दारूच्या करातून विकास हा निव्वळ भ्रम आहे.

* प्रश्न : महाराष्ट्रात काय स्थिती दिसते?
डॉ. बंग : महाराष्ट्रात पंधरा वर्षांत सिंचनावर ७० हजार कोटी खर्च झाल्याची आकडेवारी मांडली गेली. त्याच राज्यात दरवर्षी वैध आणि अवैध मिळून ४० हजार कोटींची दारू प्यायली जाते. कुठून होणार आर्थिक विकास? शेतकरी आत्महत्या होणार नाही तर काय होणार? हाच पैसा विकासाकडे वळवला तर...

प्रश्न : दारूबंदी प्रभावी पद्धतीने कशी राबवता येईल?
डॉ. बंग : देवतळे समितीपुढे आम्ही आराखडाच मांडला आहे. प्रथम दारूबंदी हा नकारात्मक नाही तर विकासाचा कार्यक्रम म्हणून स्वीकारायला हवा. दारूची उपलब्धता कमी-कमी करणे, लोकांचा थेट सहभाग आणि सर्वच पातळ्यांवर मा ॅनिटरिंग महत्त्वाचे आहे. महत्त्वाचे म्हणजे दारूबंदीकडून दारूमुक्तीकडे वाटचालीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत.
पूर्वीचे नेतृत्व ‘दारूनिष्ठ’, आताच्याकडून आशा

प्रश्न : महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व त्यासाठीचे धाडस दाखवेल का?
डॉ. बंग : पूर्वीचे नेतृत्व ‘दारूनिष्ठ’ होते. साखर, धान्यापासून दारू, वाइन निर्मिती हा त्यांचा राजकीय व आर्थिक आधार होता. तसे सध्याच्या नेतृत्वाचे नाही. नुकतेच सत्तेत आल्याने त्यांची जनतेच्या प्रश्नांची जाण ताजी आहे. ही मंडळी आजही धार्मिकतेचा व नैतिकतेचा दावा करीत असतात. त्यामुळे मी सध्या तरी आशावादी आहे.
प्रश्न : दारू ‘स्टेटस सिम्बॉल’ आहे?
डॉ. बंग : दारू संस्कृतीच्या प्रसाराचे प्रयत्न देशात जोमाने सुरू आहेत. शरद पवारांसारखे नेते वाइन हा फळांचा रस असल्याचे सांगून लोकांना भ्रमित करतात. तरीही देशातील ६० टक्केच पुरुष, ९० टक्के महिला असा बहुसंख्य समाज दारूला स्पर्श करीत नाही, हे वास्तव आहेच.