आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉइल हेल्थ कार्ड मिळणार १७ हजार शेतकर्‍यांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शेतकर्‍यांना त्यांच्या शेतजमिनीतील मातीची गुणवत्ता कळावी, या करिता जिल्ह्यातील १७ हजार ७४७ शेतकर्‍यांच्या जमिनीची तपासणी करून त्यांना "सॉइल हेल्थ कार्ड' देण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित शेतकर्‍यांना टप्प्याटप्प्याने सॉइल कार्ड वितरित करण्यात येणार आहेत.

खरीप हंगामाच्या नियोजनाकरिता नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्ह्यात २०१५-१६ या आर्थिक वर्षात सॉइल हेल्थ कार्ड वितरणाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. या कार्डमुळे पेरणी करण्यापूर्वीच शेतकर्‍यांना त्यांच्या शेतजमिनीची गुणवत्ता कळण्यास मदत होणार आहे. शेतात पेरणी केल्यानंतर अथवा पेरणी करण्यापूर्वी जमिनीतील पोषक तत्त्वे वाढवण्याकरिता कोणत्या उपाययोजना कराव्यात, याकरिता शेतकर्‍यांना महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या मदतीने प्रत्येक राज्यात सॉइल कार्ड देण्याचा हा नवा उपक्रम या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत प्रत्येक राज्याला एक विशेष संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) देण्यात येईल. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने संबंधित शेतजमिनीच्या मातीचे परीक्षण करणारे सॉइल हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. या कार्डवरच संबंधित जमिनीकरिता कोणती खते उपयुक्त आहेत, याची माहिती देण्यात येणार आहे.

जमिनीची उत्पादकता वाढवण्यास मदत
सॉइल हेल्थ कार्डद्वारे शेतजमिनीची उत्पादकता वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. शेतीजमिनीमधील पोषक गुणद्रव्यांची असलेली कमतरता भरून काढता येईल. यामुळे शेतमालाचे प्रती हेक्टरी उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. देशातील मृदा संशोधन प्रयोगशाळा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कृषी विद्यापीठातील शेतीविषयक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचाही सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या अहवालात देण्यात आली आहे.

एकूण
१७,७४७

अमरावती -१२६०
भातकुली -१२६९
नांदगाव (खं.) -१२६९
चांदुर रेल्वे -१२५९
धामणगावरेल्वे -१२५८
मोर्शी -१२५७
तिवसा -१२६९
चांदुर बाजार -१२६८
वरुड -१२५८
अचलपूर -१६६०
दर्यापूर -१२६८
अंजनगाव सुर्जी -१२९६
धारणी -१२५८
चिखलदरा -८९८