आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळसूत्र विकून बांधले शौचालय, वाशीम जिल्ह्यातील महिलेचे प्रेरणादायी कर्तृत्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - रस्त्यावर शौचाला बसणे अपमानास्पद वाटत असल्याने तिने घरीच शौचालय बांधण्याची पती व सासरच्या मंडळींकडे मागणी केली. मात्र पैशाचे कारण देत तिची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. परंतु एवढ्यावरच न थांबता तिने चक्क स्वत:चे मंगळसूत्र कुटुंबीयांच्या परस्पर िवकून शाैचालय बांधले. तिच्या या धाडसी निर्णयाने महिलांना सक्तीने उघड्यावर शौचास जाण्यास बाध्य करणा-या पुरुषी मानसिकतेला आव्हान दिले आहे. हा संघर्ष आहे सायखेडा (ता. मंगरूळपीर) येथील संगीता नारायण आव्हाळे या गृहिणीचा...
घरी शौचालय नसल्यामुळे संगीता यांना रोज उघड्यावर जावे लागायचे. रस्त्याने एखादी गाडी आली तर उठायचं अन् पुन्हा बसायचं... सतत ऊठबस करत एक तास शौचासाठी ताटकळत थांबायचं. या उठाबशा ितच्यासाठी शारीरिकच नव्हे तर मानसिक वेदनादायी होत्या. पती नारायण यांनी घर बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, पण साधे शौचालय बांधले नाही.

संगीताने वारंवार मागणी केली, मात्र पैशाचे कारण देत पतीने ती उडवून लावली. ‘गावातील इतर महिला उघड्यावर जातातच ना,’ असे उत्तरही तिला एेकावे लागले. त्यामुळे संगीता निराश झाली. परंतु तिने धीर सोडला नाही. घर बांधताना एक खोली कमी बांधा, पण शाैचालय आधी बांधा, असा लकडा तिने लावूनच धरला. मात्र पती व सासरच्यांनी तिच्या मागणीला भीक घातली नाही.
शौचालयासाठी पैसे नाहीत असे उत्तर देणा-या पुरुषी मानसिकतेविराेधात संगीताने बंड पुकारले. सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र परस्पर विकून तिने घरात शौचालय बांधण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे काही दिवस सासरच्या मंडळींनी संगीतासोबत अबोला धरला होता. मात्र काही दिवसांतच तिचा निर्णय त्यांना पटला. आता घरातील सर्वच लोक शाैचालयाचा वापर करतात. ितच्या या धाडसी निर्णयामुळे ग्रामीण भागातील सर्व महिलांसमाेर एक आदर्श निर्माण झाला आहे.

मानसिकता बदलण्याची गरज
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने आम्ही स्वच्छतेबाबत जिल्ह्यात जाणीव-जागृतीचे कार्यक्रम राबवत आहोत. या कक्षाच्या वतीने कुटुंब संपर्क अभियान राबवून व्यक्तिगत भेटीगाठीतून लोकांच्या सवयी बदलण्याचे प्रयत्न चालू आहेत. यासाठी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर केल्यास जिल्हा परिषदेमार्फत पात्र कुटुंबांना आर्थिक लाभही देण्यात येतो.
- सोनाली जोगदंड, अध्यक्षा, जिल्हा परिषद, वाशीम

शौचालय हाच दागिना
घरातील परिस्थिती बेताची असल्याने सुरुवातीला शौचालय बांधण्यास आम्ही बाप-लेकांनी विरोध दर्शवला हाेता. मात्र माझ्या पत्नीने घेतलेल्या निर्णयाला नंतर आम्ही साथ दिली. सोन्या-चांदीचे दागिने पांघरूण स्त्रीने उघड्यावर जाणे हे केवळ स्त्रीसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही लाजिरवाणे आहे. शौचालय हाच घराचा दागिना आहे.
- नारायण आव्हाळे, संगीताचे पती