आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दारुड्या मुलाकडून प्राध्यापकाचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - उपराजधानीतील पीडब्ल्यूएस महाविद्यालयाचे प्राध्यापक हरीश वासनिक यांचा शनिवारी रात्री खून झाला होता. तपासाअंती दारुड्या मुलानेच पैशासाठी त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. अक्षय हरीश वासनिक असे आरोपीचे नाव आहे.

अक्षयला दारूचे प्रचंड व्यसन आहे. या व्यसनामुळेच त्याने शिक्षण सोडले असून दिवसभर नुसता भटकत असतो. पैशासाठी तो नेहमी घरी तगादा लावायचा. शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास प्रा. वासनिक घरी एकटेच होते. तेवढय़ात अक्षय आणि त्याचा एक मित्र घरी आले. या वेळी त्याने पापडांचा व्यवसाय करण्यासाठी वडिलांकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला.

वडील टीव्ही बघण्यात मग्न असता अक्षयने स्वयंपाकघरातील बत्त्याने पाठीमागून वडिलांच्या डोक्यावर वार केले. त्यामुळे प्रा. वासनिक रक्ताच्या थारोळय़ात जमिनीवर पडले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अक्षय आणि त्याच्या मित्राने पळ काढला. काही वेळाने अक्षय आपल्या आईसोबत घरी परतला तेव्हा त्यांना वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हा प्रकार पाहून आई रडत असताना अक्षय मात्र आपल्याला काहीच माहीत नसल्याचे दाखवत होता. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच सत्य बाहेर आले.

साथीदारही जेरबंद
पोलिसांनी घराची पाहणी केली असता घरातील कपाट उघडे होते व त्यातील काही वस्तू गायब होत्या. त्यामुळे चोरीसाठी खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज बांधला. मात्र अधिक तपास व विचारपूस केली असता त्यांचा अक्षयवर संशय बळावला. अधिक चौकशी केली असता अक्षयने खुनाची कबुली दिली. त्याच्यासह मित्र अभिषेक गायधे यास अटक करण्यात आली.