आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठाएवढी जागा लागेल पार्किंगसाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बाजारपेठेत आल्यानंतर वाहन उभे करण्यासाठी जागाच नसल्याने मिळेल तेथे पार्किंग करणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि जमिनीची मर्यादा बघता, आगामी 20 वर्षांत अमरावती शहराला नुसत्या पार्किंगसाठी 225 हेक्टर जागा लागणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा विस्तार तंतोतंत याच क्षेत्रफळाच्या जागेत आहे. त्यामुळे भविष्यात पार्किंगसाठी अमरावती विद्यापीठाइतकी जागा लागेल, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

बडनेरापासून रहाटगावपर्यंत, तपोवनपासून कठोरा नाक्यापर्यंत, अशा सुमारे 121.65 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात अमरावती वसलेले आहे. शहरातील रस्त्यांवरून दररोज साडेतीन लाख वाहने धावतात. सुमारे 1.15 लाख वाहने दररोज वेगवेगळ्या ठिकाणी ‘पार्क’ केली जातात. परगावाहून शहरात येणार्‍या वाहनांचीदेखील त्यात भर पडते. अनेक बिल्डर्सनी पार्किंगच्या जागा गिळंकृत केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी पार्किंगच्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. अशात वाहने ‘पार्क’ करण्यासाठी शहरात आहे, तीच जागा आता अपुरी पडू लागली आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे.
सध्याची माहिती अपुरी : शहरात किती सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे, याची परिपूर्ण माहिती महापालिकेजवळही नव्हती. मनपा आयुक्तांना नगर रचना विभागाकडे, नगर रचना विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती मिळेल असे सांगितले. जी माहिती होती, ती बांधकामाला परवानगी देताना सोडाव्या लागणार्‍या पार्किंगची होती.
वाहनांची संख्या
- दुचाकी : 2,65,594
- चारचाकी : 21,217
- आॅटोरिक्षा : 14,376
- स्कूल बस, व्हॅन : 163
- अ‍ॅम्ब्यूलन्स : 151
- जड वाहने : 5000
- तीनचाकी मालवाहू : 1,171
- क्रेन, जेसीबी : 290
- एकूण : 3,07,970

हायड्रोलिक पार्किंगचा प्रस्ताव, प्रश्न सुटेल
४भविष्यातील गरज आणि जागेची मर्यादा बघता महापालिकेने हायड्रोलिक पार्किंगचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्ताव जसाजसा मंजूर होईल, तसतसे काम करता येईल. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न सुटेल.
- अरुण डोंगरे, मनपा आयुक्त
शहरातील जागेचा वापर
० निवासी : 1,892 हेक्टर
० औद्योगिक : 348 हेक्टर
० व्यावसायिक : 59 हेक्टर
० सार्वजनिक स्थळं : 1,036 हेक्टर
० सार्वजनिक जागा, मैदाने : 60 हे.
० रंजनासाठी जागा : 60 हेक्टर
० वाहतूक, दळणवळण : 793 हे.
० रिक्त जागा : 1,602 हे.