आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Interview Of Devendra Fadanvis In Divya Marathi

मुलाखत: तुम्हीच राजीनामे द्या अन् निवडणूक लढा; उद्धवना फडणवीसांचे प्रतिआव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शिवसेनेचा स्वत:च्या ताकदीवर खूप विश्वास आहे ना, मग भाजपच्या खासदारांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढण्याचा सल्ला आम्हाला देण्यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: अमलात आणावा. त्यांच्या खासदारांचे राजीनामे घ्यावेत आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी. ते त्यांनी करूनच दाखवावे, आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही, असे प्रतिआव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला दिले. खास दै. ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना फडणवीस यांनी प्रतिस्पर्ध्यांकडून मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाजपवर होत असलेल्या हल्ल्यावर प्रतिहल्ला चढवला. तुम्ही मराठीचे चॅम्पियन आणि आम्ही अमराठी कसे? असा थेट सवालही त्यांनी केला. फडणवीस यांच्याशी झालेला संवाद असा :
प्रश्न : मराठी अस्मिता प्रचाराचा मुख्य मुद्दा करून प्रादेशिक पक्ष तुमच्याविरुद्ध एकवटले आहेत?
* फडणवीस : भाजपचे नेतृत्व राज्यात कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे हे नेते गैरमराठी आहेत का? आम्ही मराठीच आहोत ना? आमचे नेतृत्वही तेवढेच मराठी बाणा जपणारे आहे. उलट त्यांचा (शिवसेनेचा) भूतकाळ तपासा जरा. खासदारकीचे अनेक उमेदवार देताना व अन्य काही मुद्यावर त्यांना मराठीची आठवण कशी आली नाही? मला त्यावर फार बोलायचे नाही. पण, त्यामुळे ते मराठीचे चॅम्पियन आणि आम्ही अमराठी ठरावे, हे कसे? हे पटण्यासारखे नाही. लोकांनी आम्हाला बघितले आहे.
प्रश्न : मराठी अस्मितेच्या प्रचारास उत्तर देण्यात भाजप कमी पडला का?
* फडणवीस : मुळीच नाही. शेवटी विश्वासार्हता महत्त्वाची. ती भाजपकडे, मोदींकडेच आहे. इतर लोकांच्या कथनी आणि कृतीमध्ये इतके अंतर आले आहे की लोकांनी त्यांच्यावर विश्वास का टाकावा?
प्रश्न: पण त्यांनी तुम्हाला बॅकफूटवर आणलेच ना?
*फडणवीस : आणखी किती वर्षे मराठी माणसाला मूर्ख बनवणार? मुंबई तोडणार, हा अपप्रचार कित्येक वर्षे सुरू आहे. कोणाचा बाप तोडू शकत नाही मुंबई. पण निवडणुका आल्या की काही पक्षांना तेच ते मुद्दे सुचतात.
प्रश्न : कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत?
* फडणवीस : विकास आणि भ्रष्टाचार हेच मुख्य मुद्दे आहेत. आज महाराष्ट्राचे सरासरी वय २७ वर्षे आहे. ५० टक्के जनता २५ वर्षांच्या आतील आहे. रोजगार आणि शिक्षण हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. ते मुद्दे सोडून इतर मुद्यांवर किती भर द्यायचा? ते माध्यमांमध्ये येतील, पण जनतेशी कनेक्ट होणार नाहीत. त्यांना मतदान करणार नाहीत.
प्रश्न : पण मराठी माणूस अस्मितेला महत्व देतो, हे लक्षात आले नाही का?
* फडणवीस : ही त्यांची घासलेली रेकॉर्ड आहे. रोज रेटून खोटे बोलले की ते लोकांना खरे वाटते. मोदींनी एकाच झटक्यात भूमिका स्पष्ट करत खोटा प्रचार थांबवला.
प्रश्न : विदर्भ राज्याच्या मागणीला पाठिंबा देणा-यांवर अखंड महाराष्ट्राची घोषणा करण्याची वेळ का यावी?
* फडणवीस : मोदींनी केलेले ते वक्तव्य फक्त मुंबईपुरते आहे. छोट्या राज्यांना भाजपने नेहमीच समर्थन दिले. जनसंघाच्या काळापासूनच आमची ही भूमिका आहे.
प्रश्न : वेगळ्या विदर्भाचा मुद्दा भाजपच्या जाहीरनाम्यात राहील का?
* फडणवीस : राज्याच्या जाहीरनाम्यात विदर्भाचा मुद्दा नसतो. तो केंद्राचा विषय आहे.
प्रश्न : विदर्भाच्या मागणीचा खंबीरपणे पुरस्कार करणारा तुमच्यासारखा नेता महाराष्ट्र कसा मान्य करणार?
* फडणवीस : गेली २५ वर्षे आमच्या पक्षाची ही भूमिका आहे. ती एका व्यक्तीची नाही. अन् मोदींनी फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे कुठेही म्हटले नाही. त्यांनी केवळ उत्तम आमदार असल्याचे नमूद केले. त्याचे अन्वयार्थ काढू नका.
प्रश्न : विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे तुम्ही म्हणाला होता ना?
* फडणवीस : त्या वक्तव्याचे औचित्य या क्षणी नाही. भाजपला स्वबळावर निवडून आणणे हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होईल, यावर मला बोलायचे नाही. मी त्या रेसमध्येदेखील नाही.
प्रश्न :तुम्ही रेसमध्ये नाही?
* फडणवीस : मुळीच नाही. मी प्रदेशाध्यक्ष आहे. पक्षाला निवडून आणणे, हीच माझी जबाबदारी आहे, संघटनेचा नेता म्हणून.
प्रश्न : प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर तुमचे सत्तेचे स्वप्न कसे पूर्ण होईल का?
* फडणवीस : हे खरे आहे. जे पक्ष विरोधात होते, तेच आता एका तोंडाने म्हणजेच राष्ट्रवादीच्या तोंडाने बोलायला लागले आहे. हे एक्स्पोझही झाले आहे. दूध का दूध, पानी का पानी. जनताच त्यांच्याबद्दल निर्णय घेईल.
प्रश्न : बहुमत न मिळाल्यास तडजोड न करण्याचे धाडस तुम्ही दाखवणार?
* फडणवीस : असे चित्रच निर्माण होण्याची शक्यता नाही. स्वबळावर बहुमताचा आम्हाला विश्वास आहे. मित्रपक्षांच्या मदतीने कम्फर्टेबल बहुमत मिळेलच.
प्रश्न : दर दोन दिवसांनी क्रिएटिव्ह जाहिरात पुढे आणणारी शिवसेना एवढी रिसोर्सफुल कशी?
*फडणवीस : आम्हीही जाहिराती करीत आहोत. आम्ही रिअ‍ॅक्टिव्ह नाही, प्रोअ‍ॅक्टिव्ह आहोत, एवढेच मी सांगू शकेन.

गनिमी कावा लक्षात आल्यावर..
प्रश्न : दिल्लीपुढे झुकण्याचे काँग्रेस कल्चर महाराष्ट्र भाजपतही दिसते?
फडणवीस : हे खरे नाही. युतीबाबत सर्व निर्णय महाराष्ट्र भाजपने घेतले. निर्णय घ्याल, त्याच्या पाठीशी राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला बोलण्यात गुंतवून दुसरीकडे (शिवसेनेत) २८८ची तयारी सुरू होती. हा गनिमी कावा लक्षात येताच बाजूला होण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न : उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपकडून पुरेसे उत्तर नाही?
फडणवीस : शिवसेनेला आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी मानतच नाही. खरी लढाई काँग्रेस-राष्ट्रवादीशी आहे. सेनेला भाजप पहिला शत्रू वाटत असेल तर ते त्यांनी ठरवायचे आहे. ते पुरते एक्स्पोझ झाले आहेत.

तोडणे नाही, नव्या राज्याची निर्मिती
प्रश्न : मोदींचे धुळ्यातील वक्तव्य विदर्भाला लागू नव्हते काय?
फडणवीस : विदर्भाला कसे लागू पडते, ते सांगतो. आम्ही छोट्या राज्यांचे समर्थक असलो तरी राज्य तोडत नाही, निर्माण करतो. आम्ही तीन राज्ये तयार केली. ती विकासाची मॉडेल ठरली. तुटलेल्या दोन राज्यांमध्ये वैमनस्य येऊ दिले नाही. काँग्रेसने एक राज्य तोडले. त्यामुळे आंध्र व तेलंगणा अक्षरश: एकमेकांचे वैरी झाले आहेत.