आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Interview Of Irrigation Minister Girish Mahaja In Divya Marathi

विशेष मुलाखत: सिंचन घोटाळ्यातील सर्वांची चौकशी होणारच, जलसंपदामंत्री महाजन यांची ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभाग बदनाम झाला. या खात्यातील अनियमितता तसेच कामांची वाढवलेली किंमत यामुळे धरणे तर अपूर्णच राहिली. शिवाय सिंचनातील अनुशेषामुळे राज्याची बहुतांश शेती तहानलेलीच राहिली. या पार्श्वभूमीवर युती सरकारच्या काळात या सर्व त्रुटींवर मात करून पुढे जाण्याचे मोठे आव्हान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर आहे. त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

*जलसंपदा विभागात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या भ्रष्टाचारात गुंतलेल्या मंत्री व अधिका-यांविरोधात काय कारवाई करणार?
-माजी मंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्या चौकशीला लाचलुचपत विभागाकडून सुरुवात झाली आहे. सरकार या चौकशीला वेग देण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरणातील गैरव्यवहारासंबंधी देवेंद्र शिर्के, रामचंद्र शिंदे, राजेश रिठे, गिरिराज जोशी, विजय कासाट या वरिष्ठ अधिका-यांना निलंबित केले आहे. चौकशीचा हा फक्त ट्रेलर आहे. अजून बरेच बाकी असून यातील भ्रष्टाचाराशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी केली जाईल.
*जलसंपदाची आजची स्थिती काय आहे?
- सुमारे आठ हजार कोटी या खात्याचे बजेट असून कामे मात्र हजारो कोटींची आहेत. या सगळ्याचा मेळ जमवणे फार कठीण आहे. लघु, मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे असे एकूण १९८ प्रकल्प असून आतापर्यंत यावर २२,६३६ कोटी खर्च झाले आहेत. मात्र, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजून २७,८८८ कोटी खर्च करावे लागणार आहेत. सध्याची राज्याची राज्याची आर्थिक स्थिती पाहता लगेचच एवढी रक्कम उभी करणे शक्य नसल्याने टप्पाटप्प्याने काम करण्याचा आमचा विचार आहे.
*कुठल्या कामांना प्रथम प्राधान्य देणार?
-७५ टक्क्यांपेक्षा जास्त ज्या धरणांची कामे पूर्ण झाली असतील, त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न राहील. अशा कामांमध्ये मोठे ६ प्रकल्प, १६ मध्यम प्रकल्प, तर २० लघु पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश आहे. मोठ्या ६ प्रकल्पांवर आतापर्यंत ४७२० कोटी खर्च झाले असून ७५० कोटी खर्च अजून बाकी आहे. मध्यम १६ प्रकल्पांसाठी २३४३ कोटी खर्च झालेत आणि ३५५ कोटी खर्च व्हायचे असून २० लघु पाटबंधारे प्रकल्पांवर ८४० कोटी खर्च होऊन आणखी १७४ कोटी खर्च करावे लागतील.
*मराठवाडा व विदर्भातील सिंचनाची अवस्था बिकट आहे. या भागातील शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. यावर काय उपाय करणार आहात?
-परिस्थिती बिकट आहेच, पण भागांचा अनुशेष भरून काढण्याचा आमचा प्रयत्न राहील. या भागातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त कामे झालेल्या धरणांना अंतिम रूप देण्यात येणार आहे. हा प्रश्न फक्त जलसंपदा खात्याचाच नाही, तर राज्याचा आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व संबंधित खात्यांच्या मंत्र्यांशी चर्चा करून यामधून मार्ग काढण्यात येईल. यापुढे मोठ्या धरणांचे प्रकल्पांना मंजुरी न देता छोट्या धरणांवर तसेच जलसंधारणावर भर दिला जाईल. याशिवाय सूक्ष्म सिंचन, बंधारे तसेच पाणी अडवून ते जिरवण्याचे जेवढे काही मार्ग असतील, त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.