आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Policy For Cooperative Movement In Vidarbh Region Prithiviraj Chavan

विदर्भात सहकार चळवळ रूजवण्‍यासाठी लवकरच विशेष धोरण आणू - पृथ्‍वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यात सहकारी चळवळीचा महत्त्वाचा वाटा असताना विदर्भात ही चळवळ फारशी रुजली नाही. यापुढे विदर्भात सहकाराला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच विशेष धोरण आणले जाईल’, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली.
नागपुरात क्रीडा संकुलात पार पडलेल्या राज्य सहकार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या राज्यातील 41 सहकारी संस्थांना या वेळी सहकार महर्षी, सहकारभूषण, सहकारनिष्ठ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सहकार चळवळ जोमाने वाढली. या चळवळीने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. पण, विदर्भात ही चळवळ फारशी मूळ धरू शकली नाही. विदर्भात केवळ 23 हजार सहकारी संस्था निर्माण झाल्या. त्यापैकी निम्म्या तोट्यात आहेत. त्यामुळे विदर्भात सहकाराला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण आणले जाणार आहे. सहकार चळवळीत आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. अडचणीत आलेल्या सहकारी ऊस कारखान्यांच्या पाठीशी सरकार उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्योगपती कर्ज बुडवतात, सहकारी संस्थांची मात्र बदनामी : पवार : सहकार चळवळ निकोप आणि पारदर्शी ठेवण्याचे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बडे उद्योगपती बँकांचे हजारो कोटी बुडवतात. तेच सहकारी संस्थेने केल्यास त्यांना बदनाम केले जाते. आपल्याला कोणाला पाठीशी घालायचे नाही. पण, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांचीही भाषणे झाली. सहकारी कायद्यावरील पुस्तिकेचे प्रकाशन झाले. मंचावर महापौर अनिल सोले, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ शरद निंबाळकर, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, सहकार व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मांजरा, विकास कारखाना, भाग्यलक्ष्मी बँकेचा गौरव
राज्यस्तरीय सहकारमहर्षी पुरस्कार : वारणा विभाग सहकारी ग्राहक मंडळ, मर्यादित, वारणानगर, जिल्हा कोल्हापूर.
नाशिक विभाग- सहकारभूषण पुरस्कार:
1) काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, जिल्हा अहमदनगर
2) संगमनेर तालुका दुग्ध उत्पादक व प्रक्रिया संघ, जिल्हा अहमदनगर
सहकारनिष्ठ पुरस्कार :
1) साईसेवा ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था, जिल्हा अहमदनगर
2) राधाकृष्ण विखे-पाटील सहकारी ट्रक्स वाहतूक संस्था, जिल्हा अहमदनगर
3) अमृतवाहिनी दूध व्यावसायिक सहकारी संस्था, जिल्हा अहमदनगर
औरंगाबाद विभाग- सहकारभूषण पुरस्कार : 1) मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना सेवक पतसंस्था, जि. लातूर.
2) विकास साखर कारखाना, जिल्हा लातूर,
सहकार निष्ठ पुरस्कार : 1) विशाल विविध कार्यकारी सहकारी संस्था, जिल्हा लातूर
2) दि भाग्यलक्ष्मी महिला बँक, नांदेड