आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधान! थुंकणे पडेल महागात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - रस्त्यावर थुंकल्यास दंड होतो. परंतू परदेशात, असे आपण यापूर्वी ऐकले होते. मात्र, वाहन चालवताना रस्त्यावर थुंकल्यामुळे शहरात एका युवकाला कारवाईला सामोरे जावे लागले. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासाठी न्यायालयाने त्याला दोन हजार 200 रुपायांचा दंड ठोठावल्याने या प्रश्नी एकदम जागरूकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, एका पोलिस अधिकार्‍याने कारवाई करण्याचे सौजन्य दाखवले. मात्र, महापालिकेला दंडात्मक कारवाईचे अधिकार असताना त्यांच्याकडून यासंदर्भात कारवाईच करण्यात येत नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. महापालिकेने दंडात्मक कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात सॅनेटरी अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे. मात्र, त्यांच्याकडून प्रत्यक्षात यासंदर्भात कारवाईच होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. इतकेच नव्हे तर दंड ठोठावण्यासाठी असलेले पावती बूकबद्दल विचारले असता, महापालिकेकडून ते उपलब्ध होऊ शकले नाही. दरम्यान, विदेशातील नागरिकांप्रमाणेच शहरातील नागरिकांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच शहर स्वच्छ होईल, अशा प्रतिक्रिया खुद्द नागरिकांनी दिल्या आहेत.
प्रतीक्षा सुधारित दंडाची : अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीने 12 जून 2001 मध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर रक्कम वसुलीचा ठराव पारित केला आहे. परंतु, दंडाची रक्कम कमी असल्याने संबंधितांवर आवश्यक प्रभाव होत नाही. त्यासाठी महापालिकेतर्फे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याला आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली असून, स्थायी समितीकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. यापूर्वी सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍याला 25 रुपये द्यावे लागत होते. सध्या सुधारित दराने 50 रुपये आकारण्यात येत आहे.

महापालिकेकडे नाही उत्तर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करण्यासंदर्भात महापालिकेतील स्वच्छता विभागातील अधिकार्‍यांकडे कारवाईबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात नियमित कारवाई होते, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. मात्र, आतापर्यंत प्रत्यक्षात किती जणांवर कारवाई झाली किंवा दंड वसूल केला, याची माहिती मिळाली नाही. विशेष म्हणजे, दंडासाठी पावती पुस्तिकाही महापालिकेकडे नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका तथा विद्यापीठ अशा सर्वच कार्यालयातील प्रमुखाला कारवाईचे अधिकारी आहेत; पण त्याचा वापर होताना दिसत नाही.
शहर असावे घरासारखे
शहर स्वच्छ राहावे, ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. ज्याप्रमाणे आपण स्वत:चे घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे शहरात कुठेही घाण न करता कुडादानचा वापर करायला हवा. कुठेही थुंकणे किंवा घाण करणे यावर कायमची बंदी हवी. त्यासाठी दंडाची तरतूदही भक्कम असावी. तेव्हाच शहरात साफसफाई राहील.
कल्पना देशमुख, गृहिणी.
कायदा काय सांगतो?
मुंबई प्रांतीय (प्रादेशिक) महानगरपालिका अधिनियम 1949 च्या अनुसूचीतील प्रकरण 14 मध्ये नमूद नियम 5 (1) व (2) मधील तरतुदीनुसार तसेच कलम 69 नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करण्यास मनाई आहे. दंडनीय कारवाईची तरतूदीसोबतच संबंधीताकडून आकस्मिक खर्च वसूल करता येतो. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार स्वच्छता विभागाला कारवाईचे अधिकार आहेत.
..अन्यथा द्यावा लागणार दंड
रस्त्याने जाणारा वाहनचालक थुंकल्यामुळे त्याच्याविरुद्ध मंगळवारी महाराष्टÑ पोलिस कायदा तसेच मोटर वाहन कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करीत असताना ही घटना घडली होती. कोतवालीचे ठाणेदार विजय साळुंके यांनी ही कारवाई केली होती व संबंधित खटला न्यायालयापुढे सादर करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयाने वाहनचालकाला दोन हजार 200 रुपये दंड सुनावला आहे.
नियमित कारवाई
४सार्वजनिक ठिकाणं, प्रार्थना स्थळे, याठिकाणी थुंकणे किंवा घाण करणार्‍यांवर नियमित दंडात्मक कारवाई करण्यात येते. यासाठी प्रभागनिहाय सॅनेटरी अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे.
डॉ. अजय जाधव, वैद्यकीय अधिकारी, मनपा

(फोटो - महापालिकेतील महिला व बाल कल्याण विभागात थुंकण्याने रंगवलेल्या भिंती.)