आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport Minister's Fake PA Arrested, Cheated Eight MLA

क्रीडामंत्र्यांच्या तोतया पीए जेरबंद, आठ आमदारांना घातला होता गंडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांचे स्वीय सहायक असल्याचे भासवून अमरावती जिल्ह्यातील मोर्शीच्या आमदारालाच गंडवण्याचा प्रयत्न करणा-या दोन तोतयांना पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. यापूर्वी राज्यातील आठ आमदारांना त्यांनी गंडवल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. तपासाच्या दृष्टीने गोपनीयतेची बाब म्हणून पोलिसांनी इतर सात आमदारांची नावे सांगण्यास नकार दिला.


प्रवीण शिरसाट (रा. अंतुर्ली ता. शिरपूर) आणि सदाशिव भट्टूमिस्त्री वाघ (रा. म्हाळसानगर, धुळे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून दोघेही धुळे जिल्ह्यातील आहेत. त्यांना न्यायालयाने 25 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


योजनांच्या नावावर फसवणूक करण्याचा डाव : राज्य सरकारच्या क्रीडा खात्यांतर्गत ‘गाव तेथे व्यायामशाळा’ या योजनेचे प्रस्ताव अर्ज आपल्याकडे असल्याचे सांगून आपण क्रीडामंत्र्यांचे स्वीय सहायक असल्याचे शिरसाट आणि वाघ यांनी मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांना दूरध्वनीवरून सांगितले. ‘प्रस्ताव सादर करावयाचे असल्यास अर्ज घेऊन जा, असा निरोपही त्यांनी दिला. आमदार डॉ. बोंडे यांना संशय आल्याने त्यांनी शहानिशा करण्याकरिता स्वीय सहायक धम्मदीप गवई यांना दोघांकडे पाठवले. क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनाही दूरध्वनीवर विचारणा केली. तेव्हा प्रस्ताव विक्री करणारे दोघेही तोतया असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा क्रीडामंत्री वळवी यांनी केला आहे.


अनेकांची फसवणूक
दोन्ही तोतयांनी राज्यात अनेक ठिकाणी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांचे यापूर्वी कोणाशी संबंध होते काय, हे दोघे कोठे काम करत होते, याचा तपास केला जाईल, असे अमरावती पोलिस आयुक्त अजित पाटील यांनी सांगितले.


‘त्या’ दोघांशी संबंध नाही
शिरसाट आणि वाघ यांच्याशी माझा काही संबंध नाही. माझ्या नावाचा गैरवापर करत शैक्षणिक, खासगी संस्था आणि लोकप्रतिनिधींना भेटून त्यांनी प्रस्ताव विक्री केले. रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनाही दोघे भेटले होते, असे वळवी म्हणाले.


200 छापील प्रस्ताव जप्त
पोलिसांनी सुमारे दोनशे छापील प्रस्तावांचे अर्ज दोघांकडून जप्त केले. त्यांनी दोनशे रुपयांना एक याप्रमाणे 20 अर्जांची विक्री केली.