आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष समितीकडून स्टार बसचे नियंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेला मिळणार्‍या स्टार बसचे महापौर, जिल्हाधिकारी व आयुक्तांचा समावेश असलेल्या विशेष समितीकडून नियंत्रण केले जाणार आहे. सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नगरोत्थान मिशन अंतर्गत अमरावती महापालिकेला केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून 64 स्टार बसेस प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेत परिवहन समिती गठित करण्याबाबत घोडे अडले असले, तरी विशेष समिती गठित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनेच्या नियमांनुसार या समितीचे गठन करणे बंधनकारक आहे. चेअरमन, तीन संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी (राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी) यांचा समितीत समावेश राहणार आहे. स्टार बस नियंत्रणाच्या दृष्टीने सर्वच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार समितीला असणार आहे. स्टार बसेसच्या मार्ग व जाळ्यांची रचना, आर्थिक बाजू तसेच सर्व स्तरातील सुविधा व आरक्षणाचा विचार स्टार बसचे नियंत्रण करताना करावे लागणार आहे. प्रवासी भाडे व शुल्क निश्तिच करण्याबाबतदेखील समितीला निष्पक्षपातीपणे कार्य करावे लागणार आहे. तंत्रज्ञानांची निवड तसेच जनजागृती करण्याचे कार्यदेखील समितीवर सोपवण्यात आले आहे. विशेष समिती गठित करण्यासाठी सर्वसाधारण सभेने बुधवारी (13 आॅगस्ट) मान्यता दिल्याने स्टार बस कार्यन्वयनाचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरसेवकांचा समावेश असलेल्या परिवहन समिती बरोबरच विशेष समितीदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
समितीत यांचा समावेश
महापालिका आयुक्त हे विशेष समितीचे चेअरमन असून, तीन संचालकांमध्ये महापौर, जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे. उपायुक्त हे मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार असून मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखाधिकारी व स्थायी समिती सभापती हे संचालक असणार आहेत.
समितीनंतरच अनुदान
स्टार बस नियंत्रणाबाबत विशेष समितीचे गठन करण्यात आल्यानंतरच केंद्र शासनाचे अनुदान मिळणार आहे. अभियानबाबत पहिल्या टप्प्याचे अनुदान मिळणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. समितीमुळे मात्र पदाधिकार्‍यांना त्यांना हवे तसे निर्णय घेण्यास मोकळीक मिळणार नसल्याचे दिसून येत आहे.