आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Administration Monataring On Sonography Centra

राज्यात ‘सोनोग्राफी’वर प्रशासनाची करडी नजर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राज्यातील स्त्री भ्रूणहत्येला आळा घालण्यासाठी ऑफलाइन सोनोग्राफीवर प्रशासनाची आता करडी नजर राहणार आहे. या सोनोग्राफी केंद्रचालकांनी 24 तासांच्या आत फॉर्म एफची ऑनलाइन नोंदणी न केल्यास त्यांचे केंद्र कायमस्वरूपी सील करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.


राज्यातील तब्बल तीन हजारांवर सोनोग्राफी केंद्रे ऑनलाइन करण्यात आली आहेत. या केंद्र संचालकांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली असली तरी, अद्यापही सुमारे 600 ते 700 सोनोग्राफी केंद्रचालक सोनोग्राफी करताना फॉर्म एफ ऑनलाइन भरत नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 1994 सुधारित 2003 कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे या ऑफलाइन केंद्रचालकांनी फॉर्म एफची 24 तासांत ऑनलाइन नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


केंद्रचालकांकडे कारणे अनेक
ऑनलाइन फॉर्म एफ भरण्यासाठी सोनोग्राफी केंद्र संचालकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोनोग्राफीची प्रक्रिया ऑनलाइन केल्याने गैरप्रकार बंद होणार आहेत. त्यामुळे गैरप्रकार करणा-या सोनोग्राफी केंद्रचालकांनी आता विविध कारणे समोर केली आहेत. यामध्ये सर्व्हर डाऊन आहे, वेबसाइट्सवर लिंक येत नाही, ऑपरेटर नाही, तांत्रिक बिघाड आहे, पासवर्ड घेत नाही, वेबसाइट्स ब्लॉक आहे, या कारणांचा यात समावेश आहे.


खासगी संकेतस्थळावर बंदी
राज्यातील 3 हजार सोनोग्राफी केंद्रे ऑनलाइन करण्यात आली आहेत. मात्र हे केंद्रचालक नोंदणी करत नाहीत. यापुढे त्यांनी 24 तासांत फॉर्म एफ ऑनलाइन सादर न केल्यास त्यांचे केंद्र सील करण्यात येणार आहे. ठाणे, बुलडाणा व यवतमाळमधील केंद्रचालक खासगी संस्थांच्या वेबसाइट्सवर ऑनलाइन माहिती भरत आहेत. ही पद्धतही आरोग्य विभागाने बंद केली आहे.


फॉर्म एफ भरण्याची प्रक्रिया
केंद्र संचालकांनी गर्भवतीची सोनोग्राफी करण्यापूर्वी तिचे संमतीपत्र भरणे आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्म एफ भरून त्याची माहिती ऑनलाइन सादर करावी. फॉर्म एफची प्रिंट काढून त्यावर डॉक्टरने स्वाक्षरी करून हा अहवाल (हार्डकॉपी) दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत संबंधित जिल्हा प्राधिकरणाकडे सादर करावा, असे न केल्यास संबंधित केंद्रावर फौजदारी करण्यात येणार आहे.


अद्याप आदेश प्राप्त नाहीत
सोनोग्राफी केल्यानंतर एफ फॉर्म 24 तासांत ऑनलाइन सादर करण्याचे आदेश प्राप्त झाले नाहीत. सोनोग्राफी करताना आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. डॉ. विजय राठोड, अध्यक्ष क्ष-किरण तज्ज्ञ संघटना, अकोला.