आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Minister Rajkumar Badole's Give Exam At Nagpur

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी दिली पदव्युत्तर परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेल्या ‘आंबेडकरी विचारधारा’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेला बसले असून सोमवारी त्यांनी ९.३० ते १२.३० या वेळेत ‘डॉ. आंबेडकरांचे सामाजिक विचार’ या विषयाचा पहिला पेपर सोडवला.

राजकारण म्हणजे निरक्षण, अल्पशिक्षित लोकांचा अाखाडा असा समज आहे. परंतु काही विद्वान आणि उच्चशिक्षित राजकीय पुढाऱ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुढाऱ्यांविषयीच्या प्रचलित समजाला छेद देत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ‘आंबेडकरी विचारधारा’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बहि:शाल विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. आजपासून या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी ९.३० वाजता पहिला पेपर असल्यामुळे मंत्रिमहोदय रविवारी रात्री चार वाजता गोंदियाहून नागपुरात दाखल झाले.

रात्री त्यांनी एक तास अभ्यास करून काही तास झोप काढली. सकाळी ९.१५ वाजता ते विद्यापीठाच्या महात्मा फुले शैक्षणिक परिसरातील परीक्षा केंद्रावर पोहोचले. परीक्षा केंद्रावर अतिशय सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे तीन तास बसून त्यांनी पूर्ण पेपर साेडवल्याचे ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

असाकेला अभ्यास
राजकारणाच्याशिखरावर उभे असतानाही राजकुमार बडोले यांना ज्ञानार्जनाची आसक्ती आहे. ‘आंबेडकरी विचारधारा’ या अभ्यासक्रमाची त्यांनी गंभीरतेने दखल घेतली. आपल्या व्यस्त कार्यक्रमातही त्यांनी आपल्यासोबत अभ्यासक्रमाची पुस्तके बाळगली. वेळ मिळेल त्या ठिकाणी, प्रवासात त्यांनी ही पुस्तके वाचून काढली, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

सर्व पेपर देणार
आंबेडकरी विचारधारा या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा, ही अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. परंतु वेळ मिळत नव्हता. शेवटी बहि:शाल विद्यार्थी म्हणून अर्ज भरला. आज पहिला पेपर सोडवला असून, उर्वरित तीनही पेपर देणार आहोत. १२ मे रोजी कॅबिनेट बैठक आहे. ही बैठक आटोपून १३ मे रोजीच्या पेपरसाठी नागपुरात येणार अाहे, अशी माहिती बडोले यांनी दिली.