आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sting Operation In Nagpur Jain 6 Police Men Suspended

स्टिंग ऑपरेशन : नागपूर जेलमध्ये पोलिसांच्या ऑन ड्यूटी झोपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - "मकोका’खाली शिक्षा भोगत असलेले पाच कुख्यात कैदी तुरुंगातून पळून गेल्यानंतरही नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झाली नसल्याचा अनुभव दस्तुरखुद्द अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांना आला. त्यांनी गुरुवारी मध्यरात्री अचानक या कारागृहाला भेट दिली असता चार सुरक्षा रक्षक कर्तव्यात कसूर करताना आढळून आले, तर ‘वॉच टॉवर’वरील दोन शिपाई चक्क झोपा घेत होते. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत बोरवणकर यांनी या सहाही शिपायांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
नागपूर तुरुंगाची सुरक्षा भेदून सोमवारी मध्यरात्री पाच कुख्यात कैदी पळून गेल्यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणेवर टीका होत आहे. या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी मीरा बोरवणकर गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात तळ ठोकून आहेत. त्यांच्या आदेशानुसार गेल्या दोन दिवसांत कारागृह अधीक्षक वैभव कांबळे व इतर दोन तुरुंगाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक कारागृह प्रशासनाबाबत असंख्य तक्रारी ऐकल्यानंतर बोरवणकर यांनी त्यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’च केले.
गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास त्यांनी अचानक कारागृहात जाऊन पाहणी केली. या वेळी चार सुरक्षा रक्षक कर्तव्यात कसूर करताना आढळून आले, तर ‘वॉच टॉवर’वरील दोन शिपाई मंगेश प्रजापती व आर. आर. पाटील हे चक्क गाढ झोपेत होते. याच टॉवरचा चकवा देऊन जेव्हा कैदी पळून गेले होते, त्या वेळेही हे दोघेच ड्यूटीवर असल्याचे बोरवणकर यांना चौकशीत समजले.

त्यामुळे या सहाही जणांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश बोरवणकर यांनी दिले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाईचे पत्र तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिकाऱ्यांच्या डब्यातून ‘सुविधा’

नागपूरच्या कारागृहात अधिकाऱ्यांचे खिसे गरम केले की कैद्यांना मागेल ती सुविधा मिळते, अशी माहितीही बोरवणकर यांच्या चौकशीत समोर आली आहे. होळीच्या दिवशी कैद्यांना पाच हजारांत एक बंपर, दोन हजारांत क्वार्टर, शंभर रुपयांत खर्रा विकला गेला. कारागृहातील अधिकाऱ्यांना जेवणाचे डबे नेहमीच येतात. त्याची कोणीही तपासणी करत आहे. या डब्यातूनच कैद्यांना सर्व वस्तू पुरवल्या जातात. याच डब्यातून परतीच्या प्रवासात कैद्यांकडून येणारी वसुली अधिकाऱ्यांच्या घरांपर्यंत पोहोचते, अशी माहितीही समोर आली आहे.
‘एसीबी’कडून चौकशी

कारागृहातील भ्रष्टाचाराचा तपास करण्यासाठी ‘एसीबी’चे महासंचालक प्रवीण दीक्षित हे शुक्रवारी नागपुरात दाखल झाले. दिवसभर त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सायंकाळी सात वाजता ते तुरुंगात गेले असल्याची चर्चा होती. परंतु यासंदर्भात पुष्टी होऊ शकली नाही. दीक्षित यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, योग्य वेळी बोलणार असल्याचे ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
‘ब्ल्यू फिल्म’चे पेनड्राइव्ह उपलब्ध

नागपुरच्या कारागृहातील बहुतांश बराकींमध्ये टीव्ही लागलेला आहे. काही टीव्ही संचांना यूएसबी पोर्ट असल्यामुळे कैदी ‘ब्ल्यू फिल्म’ने भरलेल्या पेनड्राइव्हची मागणी करतात. काही अधिकारी त्यांची ही ‘फर्माईश’ पूर्ण करत असल्याचेही समोर आले आहे.

पत्नीला भेटण्यासाठी कैद्याला कक्ष

या कारागृहातील कुख्यात गुंड डल्लू सरदार याचा दोन महिन्यांपूर्वी वाढदिवस होता. त्या वेळी त्याने आपल्या पत्नीला एकांतात भेटू देण्याची विनंती तुरुंग अधिकाऱ्यांकडे केली होती. यासाठी त्याने बराच पैसा मोजला. मग काय, डल्लू सरदारला पत्नीशी भेटण्यासाठी अधीक्षकांचा कक्ष उपलब्ध करून देण्यात आल्याचेही सांगितले जाते.

नवा कारागृह अधीक्षकही वादग्रस्त?

आरोपी फरार झाल्याप्रकरणी कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी ‘एसीबी’ची कारवाई आणि महिला अधिकाऱ्यांशी असभ्य वर्तणूक केल्याच्या आरोपांमध्ये दोन वेळा निलंबित झालेला अधिकारी नागपुरात नियुक्त केला जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.