आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलली पुस्तकांची दुकाने; आज शाळेचा पहिला दिवस, विद्यार्थी सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नवीन करकरीत पुस्तकांचा सुगंध , रंगीबेरंगी चित्रे, विविध कार्टून्समुळे चिमुकल्यांना शाळेत जाण्याचे वेध लागले आहेत. गुरुवारी, 26 जून रोजी जिल्ह्यात शाळेची घंटा वाजणार असल्याने शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात पालकांची गर्दी होत आहे.
उन्हाळ्याच्या सुटीतील धमाल संपवून विद्यार्थी शाळेसाठी तयार झाले आहेत. नवीन दफ्तर, टिफिन, शूज, वह्या, पुस्तके व इतर शालेय साहित्य खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची मंगळवारी गर्दी पाहायला मिळाली. उद्याच शाळेचा पहिला दिवस असल्याने शहरातील राजापेठ, गांधी चौक, मोची गल्ली, जवाहर गेट, गाडगेनगर, राजकमल चौक आदी परिसरातील दुकानांवर शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थी, पालकांची लगबग होती. आकर्षक कार्टून कॅरेक्टर असलेले नोटबूक, स्कूलबॅग, पेन्सिल, वॉटरबॅग, टिफिन आदी विविध साहित्यांना चिमुकल्यांची विशेष मागणी आहे. यंदा पहिल्यांदाच शाळेत जाणार्‍या लहान मुलांमध्ये कमालीची उत्सुकता आणि कुतूहल दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच बाजारात खरेदीला विशेष प्रतिसाद मिळाला. सुमारे आठ दिवस पालक, विद्यार्थ्यांची अशीच गर्दी राहणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिल्या.
आम्ही आहोत शाळेसाठी तयार, विद्यार्थ्यांमध्ये जोश
गुरुवारी (दि. 26) शहरातील शाळांमध्ये पहिली घंटा वाजणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये धमाल केल्यानंतर शाळेसाठी ‘हम तैयार है’चा जोश खरेदीला आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासह शाळेची पायरी पहिल्यांदाच चढणार्‍या चिमुकल्यांमध्येही दिसून येत आहे. पालकांकडे शालेय साहित्यासाठी त्यांचाही हट्ट सुरू आहे.
मी सहावीसाठी केली खरेदी ४मी इयत्ता सहावीसाठी पुस्तके, नोटबूक व इतर साहित्य विकत घेतले आहे. गुरुवारीच शाळा उघडणार असल्याने मला उत्सुकता लागली आहे. नवनवीन प्रकारचे शालेय साहित्य असल्याने मला आनंद होत आहे. दोन हजार 130 रुपयांचे साहित्य माझ्यासाठी विकत घेतले.
- तेजस जोगळे, विद्यार्थी.

दरांमध्ये झाली वाढ
४तिसरी आणि चौथीची बदललेली नवीन पुस्तके गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 ते 60 टक्क्यांनी महाग आहेत. या नवीन पुस्तकांपैकी काही पुस्तके उपलब्ध नाहीत. खरेदीला नागरिकांचा प्रतिसाद आहे. नोटबूक आणि स्टेशनरीच्या किमतीही 10 ते 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
राजू लाठिया, शालेय साहित्य विक्रेते.
(फोटो - शालेय साहित्याच्या दुकानांमध्ये पालक व विद्यार्थ्यांची अशी गर्दी उसळलेली असल्याचे चित्र शहरातील दुकानांमध्ये दिसत आहे. छाया : शेखर जोशी)