आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधांचा अभाव: हॉस्टेल अनंत, अनारोग्याची खंत; विद्यार्थ्यांची खासगीकडेच धाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शिक्षणाच्या निमित्ताने घरापासून दूर राहणार्‍या विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न गहन होऊ लागला आहे. स्वतंत्र खोल्यांपासून टीव्ही, फ्रिजची सुविधा देणार्‍या वसतिगृहांची संख्या शहरात उदंड आहे, पण त्यांच्या प्रकृतीकडे पाहिजे तितक्या गांभीर्याने वसतिगृह प्रशासन लक्ष देत नाही. एखाद्याची प्रकृती बिघडली, की त्याला वसतिगृहातून स्वत:च उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते.
वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन, खोल्या व परिसराची स्वच्छता, शिस्त, सुरक्षा आणि प्रथमोपचाराची जबाबदारी त्या-त्या शैक्षणिक संस्थांचे अधिकारी, वसतिगृह निरीक्षक, अधीक्षक यांच्यावर असते. शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व संस्थांसाठी जवळपास हे नियम सारखेच आहेत. विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण, पिण्याचे पाणी, अन्न-धान्य यांची नियमित तपासणी व्हावी, आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांचे पॅनेल असावे. त्यात मुलींची तपासणी करण्यासाठी महिला डॉक्टरचा समावेश असावा. आपत्कालीन प्रसंगी जवळच्या शासकीय रुग्णालयात त्यांना नेले जाणे अपेक्षित आहे. तशा मार्गदर्शक सूचनाही आहेत. पण, जवळच्या जवळ उपचार करून घेण्याच्या नादात शासकीय रुग्णालयाकडे बहुतांश सर्वच वसतिगृहांनी पाठ फिरवली आहे. त्यामागे कारणेही नमूद केली जात आहेत.
महाविद्यालय व वसतिगृहातील अधिकारी, विद्यार्थी व पालकांचा शासकीय दवाखान्यांमध्ये मिळणार्‍या उपचारांवर विश्वासच नाही. तेथे गेल्यानंतर तातडीने उपचार होत नाहीत. त्यामुळे आम्ही व विद्यार्थीही येथे जाणे टाळतो, असे अनेक प्राचार्य, प्राध्यापक, रेक्टर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. शहरातील जवळपास 33 वसतिगृहांशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या वैद्यकीय सुविधा व ते करीत असलेल्या उपायांची जाणीव झाली.
सक्षम सुविधा मिळाव्यात
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वच प्रकाराच्या वसतिगृहांमधून काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये आपत्कालीन स्थितीत तत्काळ प्रतिसाद मिळत नाही. विद्यार्थी, पालकांमध्येही अशा रुग्णालयांप्रति विश्वासार्हता कमी आहे. त्यामुळे सर्वच वसतिगृहांमधून विद्यार्थ्यांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात.
-धर्मपाल शिंगाडे, प्रभारी तंत्रशिक्षण सहसंचालक
जबाबदारी संस्थांची
वसतिगृह कोणतेही असो, तेथे पुरेशा सुविधा पुरवण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असते. शासनाची वसतिगृहे संस्थांना दिलेली असतात. महाविद्यालयांमधील वसतिगृहांवर प्राचार्य आणि रेक्टर नियंत्रण ठेवतात.
-डॉ. डी. टी. माने, एओ, उच्च् शिक्षण सहसंचालनालय
आरोग्यविषयक ज्ञान असावे
प्रत्येक महाविद्यालयाशी संलग्न किमान एक आरोग्य समिती असावी. त्यांनी विद्यार्थी, शिक्षकांना प्रथमोपचाराचे धडे द्यावेत. विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, लैंगिक अशा अनेक समस्या असू शकतात. अनेक समस्या ते उघडपणे मांडू शकत नाहीत. अशा वेळी कौन्सेलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या जाव्यात.
-डॉ. उज्‍जवल बारंगे, शल्यचिकित्सक