आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलीने मिळवले ९७%, नागपुरातील रुपल गुप्ताचे घवघवीत यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपुरातील एका पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलीने इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९७.०८ टक्के गुण प्राप्त करीत आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले. रुपल रवींद्र गुप्ता असे या यशवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य विषयात शिकते. बुधवारी निकाल जाहीर झाला तेव्हा रुपलला आकाश ठेंगणे झाले. घरी इंटरनेट नसल्यामुळे तिला मित्र, मैत्रिणींकडून निकाल समजला. ‘प्रथम स्वत:च्या निकालावर विश्वासच बसला नाही. परंतु हळूहळू सर्व मित्र, मैत्रिणींनी फोन करून तिला तिच्या यशाची माहिती दिल्याने खात्री पटली’, अशी पहिली प्रतिक्रिया तिने दिली.

रुपलच्या यशानंतर महाविद्यालय प्रशासनानेही रुपल आणि तिच्या पालकांचा सत्कार केला. प्रतिकूल परिस्थितीही मुलीने मिळवलेले हे यश बघून तिच्या आई- वडिलांचे डोळे भरून आले होते.

शिक्षणासाठी घरही विकले
रुपलची आई पुष्पा गुप्ता म्हणाल्या की, ‘आम्हाला दोन मुली आहेत. एक रुपल आणि दुसरी पारुल. दहा वर्षापूर्वी आम्ही नागपुरातील हंसापुरी येथे राहायचो. त्या वेळी माझे पती किराणा दुकानांत काम करायचे. परंतु तेथील पगारावर कुटुंबाचा खर्च भागत नव्हता. शिवाय मुली मोठ्या होऊ लागल्याने त्यांच्या शिक्षणाचाही खर्च वाढत होता. त्यामुळे दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी इतवारी येथील घर विकण्याचा निर्णय घेतला. त्यातून मिळालेले अर्ध्यापेक्षा अधिक पैसा बँकेत मुलींच्या नावाने ठेवला, तर काही पैशातून नागपूरबाहेरील वाडी परिसरात घर बांधले. याच भागात रवींद्र यांनी पाणीपुरीचा ठेला सुरू केला. या व्यवसायातूनच रुपल आणि पारुल यांचे शिक्षण केले. घर खर्च करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. अामच्या परिस्थितीचा विचार करताना अनेकदा रडायला येत होते’ हे सांगत असताना पुष्पा गुप्ता यांचे डोळे भरून आले होते.

लहानपणापासूनच हुशार
रुपल ही लहानपणापासून हुशार आहे. नर्सरीपासून ही वर्गात पहिली यायची. तिच्यामुळे आम्हाला सन्मान मिळाला. त्यामुळे तिच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही. दहावीमध्येही रुपलने ९७ टक्के गुण मिळवले. आज तिने आपल्या आईवडिलांचे नाव काढले असून आम्हाला तिचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया तिच्या आईवडिलांनी दिली.

महाविद्यालयात यायची पालिकेच्या बसने
वाडीपासून डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे अंतर १० किमी आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ती महाविद्यालयात बसनेच यायची. घरच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे तिने दुसऱ्या मुलींप्रमाणे गाडीसाठी आईवडिलांकडे कधीच हट्ट केला नाही.

खूप परिश्रम घेतले, सीए व्हायचंय...
बारावीमध्ये चांगल्या गुणांनी पास होण्यासाठी परिश्रम घेतले होते. आज खूप आनंदी आहे. घरची परिस्थिती बेताची असली तरी आईवडिलांनी कधीच महाविद्यालय किंवा शिकवणीचे शुल्क थकवले नाही. यापुढे सीए करायचे असून आईवडिलांना गरिबीतून बाहेर काढण्याची इच्छा रुपलने बोलून दाखवली.

विषयनिहाय गुण
इंग्रजी - १०० पैकी ९४
अर्थशास्त्र - १०० पैकी ९७
बुक किपिंग - १०० पैकी १००
सेक्रे. प्रॅक्टिस - १०० पैकी ९९
अाय.टी. - १०० पैकी ९५
पर्यावरण - ५० पैकी ५०
बातम्या आणखी आहेत...