आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशीच्या कैद्याकडे माेबाइल, CM ची नागपूर कारागृहाला अचानक भेट, एक निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - कुख्यात पाच कैदी फरार झाल्यानंतर देशभर चर्चेत अालेल्या नागपुरातील मध्यवर्ती कारागृहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी अचानक भेट दिली. या वेळी त्यांनी घेतलेल्या झाडाझडतीत चक्क फाशी यार्डात शिक्षा भाेगत असलेल्या एका कैद्यासह दाेघांकडे माेबाइल अाणि शंभर ग्राम गांजा अाढळून अाला. याप्रकरणी अाराेपीला माेबाइल पुरवणाऱ्या पाेलिसास तडकाफडकी निलंबित करण्यात अाले.

गेल्या ३१ मार्चच्या मध्यरात्री पाच कुख्यात कैदी पळून गेल्यानंतर या कारागृहाची माेठ्या प्रमाणावर तपासणी सुरू करण्यात अाली अाहे. कारागृह उपमहासंचालकांसह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून मुख्यमंत्र्यांना माहिती दिली हाेती. तसेच येथील कैद्यांकडे अाजवर १५० हून अधिक माेबाइल, शस्त्रे व अंमली पदार्थ सापडले अाहेत. दरम्यान, फडणवीस यांनी साेमवारी सकाळी अचानक या कारागृहाला भेट दिली. यादरम्यान रवी अण्णा नावाच्या कैद्याकडे एक मोबाइल आणि दोन गांजाच्या पुड्या सापडल्या. त्यापूर्वी राऊंडवरील अधिकाऱ्यांना फाशीच्या शिक्षेतील कैदी अमोल लोहकर याच्याकडे मोबाइल आणि गांजा सापडला. शिपाई श्रीकृष्ण राहाटे याने हा मोबाइल पुरवला होता, असे लोहकरने अधिकाऱ्यांना सांगितले. या माहितीनंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित शिपायाला निलंबित करण्याचे आदेश दिले. या वेळी प्रभारी तुरुंग अधीक्षक मंगेश जगताप आणि वरिष्ठ तुरुंगाधिकारी बी. काळे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी ठेवले कारागृहाबाहेर मोबाइल
तुरुंग महानिरीक्षक, तुरुंग उपमहानिरीक्षक, अधीक्षक, तुरुंगाधिकारी अशा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कारागृहाच्या आतमध्ये मोबाइल घेऊन जाण्यास नियमानुसार बंदी अाहे. जर एखाद्या अधिकाऱ्याने मोबाइल आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यास प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांनी रोखावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. फडणवीस यांनी स्वत: आपले मोबाइल कारागृहाच्या प्रवेशद्वारावर जमा केले आणि नंतर कारागृहात प्रवेश केला, हे विशेष.

कारागृह प्रशासनाची फेररचना करणार
कारागृहात १५० मोबाइल सापडतात आणि ते दाेन वर्षे लपवून ठेवले असतात, हा गंभीर प्रकार अाहे. यावरूनच कारागृह प्रशासनाची पुनर्रचना करण्याची गरज आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराचे जाळे निर्माण करणे आणि येथील छोटे दुवे दूर करण्याबाबत आदेश काढण्यात येईल. फरार कैद्यांबाबत संपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे. प्रशासनाच्या मदतीशिवाय हे कैदी पसार होऊ शकत नाही, अशी माहिती समोर आली आहे. ती अतिशय धक्कादायक असून या प्रकरणी येत्या काही दिवसांत आणखी महत्त्वपूर्ण माहिती पुढे येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रिंटिंग प्रेसच्या गाड्यांमधून अाराेपींना पुरवले मोबाइल
मुंबई - नागपूर तुरुंगात सापडलेले मोबाइल तुरुंगात असलेल्या प्रिंटिंग प्रेसच्या गाड्यांमधून तेथे नेले होते, अशी धक्कादायक माहिती गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. तसेच या तुरुंगातील कर्मचारीच सीसीटीव्ही आणि जॅमरमध्ये छेडछाड करीत असल्याचे दिसून अाले अाहे. त्यामुळे यापुढे त्याची देखरेख खासगी कंपन्यांकडे सोपवण्याचा विचार सरकार करीत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

नागपूर तुरुंगात एक प्रिटिंग प्रेस आहे. या प्रेसच्या गाड्या तपासणी न करताच कारागृहात पाठवल्या जातात. या गाड्यांमधूनच मोबाइल आणि अन्य आक्षेपार्ह वस्तू तुरुंगात नेल्याचे उघड झाले अाहे. एवढेच नव्हे तर कारागृह कर्मचाऱ्यांच्या मदतीने सीसीटीव्ही वा जॅमर बंद करण्याचे प्रकारही सर्रास घडले. त्यामुळे यापुढे केवळ नागपूरच नव्हे, तर राज्यातील सर्वच कारागृहांतील सीसीटीव्ही आणि जॅमर देखरेखीचे काम खासगी कंपन्यांकडे सोपवण्याचा विचार गृह विभाग करीत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मानखुर्द येथे नवीन तुरुंगाची योजना
मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी अाहेत. त्यामुळे मुंबईला आणखी एका तुरुंगाची आवश्यकता आहे. यासाठी मानखुर्द येथे जागा द्यावी, अशी मागणी महसूल विभागाकडे करण्यात आली आहे. मानखुर्द येथे ५० एकर जागा असून ही जागा मिळाल्यास तेथे साधारणतः दीड हजार कैदी ठेवता येतील असा तुरुंग बांधण्याची योजना असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले